अमरावती :उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड-१९ चे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनांच्या नावावर शासनाच्या विविध यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी बोगस बिले दाखवून मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्ले. या काळात झालेल्या कोट्यवधीच्या उपचार घोटाळ्याची राज्यभरात चौकशी व जमविलेली अनैतिक संपत्ती जप्त करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली. त्यांनी या विषयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संमतीनेच राज्यकर्ते व अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केला. असा घोटाळा करणारे अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील संबंधित अधिकारी-लोकप्रतिनिधी यांची चौकशी करावी व दोषींवर गुन्हे दाखल करावे. रेमडेसिविर इंजेक्शन, इतर इंजेक्शने, मेडिसिन व इतर मेडिसिन, चेकअप किट, बेड, ऑक्सिजन व इतर लागणारी औषधे उपकरणांच्या खरेदीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार सरकारी अधिकाऱ्यांनी केला. हे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य ठाकरे सरकारच्या काळामध्ये करण्यात आले व या कृत्याला तत्कालीन मुख्यमंत्र्यांची मूक संमती होती. या अतिशय गंभीर प्रकरणातील सर्व बाबी उघड होऊन जनतेपुढे यायला हव्यात. यासाठी चौकशीअंती श्वेतपत्रिका प्रकाशित करावी. जे घटक भ्रष्टाचारात सहभागी आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. ही चौकशी प्रवर्तन निदेशनालय (ईडी) मार्फत व्हावी, अशी मागणीही आमदार रवी राणा यांनी केली.
--