विजया रहाटकर : विद्यापीठात महिला संरक्षण अधिनियमावर कार्यशाळाअमरावती : महिलांचा सन्मान, जीवनमान उंचावणे, पीडित महिलांना न्याय मिळवून देणे हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कर्तव्य आहे. महिलांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा, त्यांना संरक्षण मिळावे व अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रत्येक संस्थेंतर्गत महिला तक्रार निवारण समितीची स्थापना केली आहे. या समितीने महिलांच्या तक्रारींची संवेदनशीलतेने चौकशी करावी व महिलांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनात्मक प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले. विद्यापीठ व महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने ‘कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम -२०१३’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन के.जी.देशमुख सभागृहात शनिवारी पार पडले. यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून पुणे सेवासदन सोसायटीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, विधीज्ज्ञ पद्मा चांदेकर, कुलसचिव अजय देशमुख, बीसीयूडीचे संचालक राजेश जयपूरकर, आयोगाच्या उपसचिव मंजुषा मोरोणे, अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष मनीषा काळे, विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे, विशाल केडिया आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात संत गाडगेबाबा व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन, दीप पज्ज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरूंचे हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन रहाटकर, कांचन गडकरी यांचा विद्यापीठाच्यावतीने सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत कुलसचिव अजय देशमुख यांनी केले. प्रास्ताविक मनीषा काळे यांनी, तर संचालन मोना चिमोटे तर आभार वैशाली चौखंडे यांंनी मानले.
महिलांच्या तक्रारींची चौकशी करा
By admin | Published: February 13, 2017 12:13 AM