अमरावती : इप्राईम सेल या नेटवर्क मार्केटिंंग कंपनीत अमरावती जिल्ह्यातील १४० आयडीधारकांची २४ लाख ५० हजारांनी फसवणूक झाल्याची तक्रार शहर सायबर पोलिसांकडे आतापर्यंत नोंदविण्यात आली. यात आणखीन शेकडो आयडीधारकांनी गंतवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे २५ लाखांवरील आर्थिक फसवणुकीचा गुन्हा हा आर्थिक गुन्हे शाखेकडे अधिक तपासाकरिता वर्ग करण्यात येतो. त्यामुळे सायबर पोलिसांकडून हे प्रकरण लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘इप्राईम’सेलच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी करून यातील अधिकृत आयडीधारक गुंतवणूकधारकांना अधिक रक्कम ही कंपनी मिळवून देत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अनेकांना गुंतवणूक झालेल्या पैशांचा परतावा न मिळाल्याने एका आयडीधारकांच्या तक्रारीवरून या प्रकरणात सायबर पोलिसांकडे ३ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. सर्वप्रथम या प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर शेकडो आयडीधारकांची लाखो रुपयांची यात गुंतवणूक झाल्याची शक्यता असल्याचे वर्तविल्यानंतर शेकडो आयडीधारकांनी आमची फसवणूक झाल्याचे सांगत पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी ‘इप्राईम’ सेल या नेटवर्क मार्केंटिंग कंपनीत आयडीधारकांनी पाच हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत गुंतवणूक केले आहे. या नेटवर्क मार्केंटिकचे जाळे राज्यभर असून यात हजारो आयडीधारकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेने तपास केल्यास या प्रकरणातील बडे मासे हाती लागण्याची शक्यता आहे. सदर कंपनीच्या तीन संचालकासह एका महिलेविरुद्ध यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोट
या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा नोंदविल्यानंतर या कंपनीत गुंतवणूक केलेल्या १४० आयडीधारकांनी तक्रार केली. त्याची फसवणुकीची एकूण रक्कम ही २४.५० लाख आहे. अधिक तपास सुरू असूून आणखीन तक्रारदार वाढण्याची शक्यता आहे.
- सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक सायबर सेल