अमरावती : चिटफंडच्या नावावर येथील एका दाम्पत्याने गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केली. घोटाळ्यातील ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. २२ जानेवारी रोजी याप्रकरणी एका गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरून मिलन हिम्मतलाल पोपट (३५, फ्लॅट नं. १०४, श्रीनिवास अपार्टमेंट, पूनम इलेक्ट्राॅनिक्सजवळ, अंबिकानगर, अमरावती) व एक महिला अशा दोघांविरुद्ध चिटफंड ॲक्टचे कलम ४, ५ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
मिलन पोपट व एका महिलेने रुक्मिणीनगरस्थित एका मंगल कार्यालयाच्या बाजूने स्वत:चे चिटफंड कार्यालय उघडले. ते स्वत:च ती चिटफंड कंपनी संचालित करीत होते. तेथे शहरातील अनेक लब्धप्रतिष्ठितांकडून पाच वर्षांसाठी ठराविक रक्कम स्वीकारली गेली. लकी ड्रॉ कूपन काढण्यात आले. गुंतवणूकदारांना निर्धारित कालावधीत परतावा देण्यात आला. शहरातील अनेकांनी त्यात गुंतवणूक केली. मात्र, दोन महिन्यांपासून मिलन पोपटने ते कार्यालय बंद केले. त्यामुळे अनेकांनी तेथे धाव घेतली. अनेकांना निर्धारित कालावधी पूर्ण केल्यानंतर व्याज तर सोडाच, मुद्दलही न मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये असंतोष पसरला. त्याचाच परिपाक म्हणून पोलीस आयुक्तांच्या आदेशाने २२ जानेवारी रोजी दुपारी मिलन पोपट व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सूत्रधार मिलन पोपट फरार झाला आहे.
राहा सजग, करा चिकित्सा
गुंतवणूकदार बऱ्याच वेळा अधिक व्याज मिळेल या लालसेने त्या योजनेची पूर्ण माहितीही घेत नाहीत. त्यात कुठे धोका आहे, हे जाणून घेत नाहीत. गुंतवणूक करताना कोणत्याही गुंतवणूक योजनेचे बेसिस फिचर्स जाणून घ्या. त्याचे फाइन प्रिंट्स, ब्रॉशर्स व्यवस्थित वाचा.
आपला पैसा कुठे गुंतविला जाणार आहे? बँक ठेवींपेक्षा जादा व्याजाचा निश्चित आर्थिक परतावा मिळणार असेल तर तो कसा मिळेल? आपल्या गुंतवणुकीशी संबंधित कोणते धोके आहेत? कोणी व्यक्ती, संस्था जादा व्याज देण्याचे किंवा मार्केटपेक्षा अधिक परतावा देण्याची भाषा करीत असेल तर त्यात अधिक धोका आहे, हे लक्षात घ्यायला हवेच. आजही अनेक जण आयुष्यभराची कमाई चिटफंडमध्ये गुंतविण्यास मागेपुढे पाहत नाहीत. ही गुंतवणूक म्हणजे एक प्रकारचा जुगारच असतो.