अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सन २०२३-२०२४ या वर्षात सुवर्ण महोत्सवी वाटचाल सुरू होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याघ्र प्रकल्पासह मेळघाटातील आदिवासींच्या भेटीसाठी यावे, असे निमंत्रण पत्र अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी पंतप्रधान कार्यालयात प्रत्यक्ष भेटून दिले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटात साजरा व्हावा यासाठी खासदार राणा यांनी आतापासूनच नियोजन चालविले आहे. १९७३-७४ मध्ये या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. २०२४ मध्ये त्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते व्हावे यासाठी खासदार राणांनी पत्रव्यवहार सुरु केला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या मेळघाटात आल्या होत्या. त्यानंतर कोणीही पंतप्रधान मेळघाटात आलेले नाही. नरेंद्र मोदी हे मेळघाटात येणारे दुसरे पंतप्रधान असतील, असे नवनीत राणा यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मेळघाटचे वाघ, वनवैभव बघा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेळघाटला यावे आणि वनसंपदा, वनवैभव, वाघांचे अस्तित्व यासह संपूर्ण आदिवासीबहुल भागाची पाहणी करावी, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. आदिवासींची संस्कृती, परंपरा जवळून बघावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना सुद्धा त्यांनी मेळघाटात येण्याचे निमंत्रण दिले आहे.