अमरावती : मालवाहू वाहनांच्या दोन वर्षानंतर होणा-या योग्यता प्रमाणपत्राकरिता (पासिंग) केल्या जाणा-या तपासणीचे यापुढे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. अमरावती प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत दरपत्रक मागविले आहे. केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९ च्या नियम ६२ नुसार वाहन तपासणीच्या सर्व चाचण्या घेणे आवश्यक आहे. याप्रकरणी वाहन पासिंगच्या कामकाजातील त्रुटींच्या मुद्द्यावरील जनहित याचिकेवर (क्र. २८/२०१३) निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने वाहन योग्यता प्रमाणपत्र जारी करताना होणा-या तपासणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे निर्देश दिलेत. याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिका-यांना १२ सप्टेंबर २०१७ च्या पत्रान्वये सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत दरपत्रक मागविले आहे. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एसआयटी स्थापन करण्याचे निर्देशही दिले आहेत. वरिष्ठ सनदी अधिका-याच्या अध्यक्षतेखाली ही समिती राज्यातील सर्व परिवहन कार्यालयातील पासिंगचा कामाचा आढावा घेऊन अहवाल शासनास सादर करेल. पासिंग प्रक्रियेचे कामकाज, प्रत्येक मोटर वाहन निरीक्षकाकडून प्रतिदिन किती वाहनांची तपासणी केली जाते, तपासणीच्या तारखेस संबंधित निरीक्षकाची त्याकामी नियुक्ती केली आहे किंवा कसे, याबाबत व्हिडीओ रेकॉर्डिंग पूरक ठरणार आहे.
योग्यता प्रमाणपत्र जारी करताना वाहन तपासणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येईल. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परिवहन आयुक्तांच्या सूचना प्राप्त झाल्यात.-विजय काठोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती