लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : अप्पर वर्धा प्रकल्पाचे सोडलेले पाणी कालव्याने शेवटच्या शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी वाढलेल्या झाडे-झुडुपे व गवतावाटे नदी-नाल्यांनी वाहत आहे. त्यामुळे सिंचनाचे बारा वाजले आहेत. शेतात पेरलेल्या गहू व चण्याला पाणी मिळत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली़. १३ कोटी रुपयांच्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४ कोटींवर पोहोचला. ७० हजार १६९ हेक्टरमधील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फारशी फलद्रुप झाली नाही.नदी-नाल्याने वाहते पाणी धामणगाव तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्प जुना धामणगाव अंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव, घुसळी, जळका वितरिका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून शेतकऱ्यांना रबी हंगामात पाणी दिले जाते. हे सोडलेले पाणी मोजक्याच वितरिकेतून जाते. झाडे-झुडुपे काढली जात नसल्यामुळे गहू व हरभरा पिकाला पाणी मिळण्याऐवजी सिंचनाचे पाणी नदी नाल्यात शिरत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तीन वर्षांत कागदावरच कामेअप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सोडण्यापूर्वी कालव्यातील झाडे झुडपे व गवत प्रकल्पाच्या यांत्रिक विभागाच्या वतीने काढण्यात येते. प्रत्यक्षात मशीनचे भाडे काढण्यापुरतेच कामे केली जातात. काही ठिकाणी झाडेझुडपे काढली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.प्रकल्पाच्या यांत्रिक विभागाने कालव्याची साफसफाई केली नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून लक्षात आले. या विभागातील संबंधितांविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार केला आहे.- प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वे