धरणात पाण्याचा साठा मुबलक : गहू पेरणीसाठी मात्र पाणी नाही
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना, शेतकऱ्यांना गहू पेरणीच्या हंगामात पाणी देण्यात आले नाही. त्यामुळे सिंचन विभाग शेतकऱ्यांप्रति दुजाभाव करीत असल्याचा आरोप होत आहे.
यंदा सुरुवातीला उडीद, मूग ही पिके हातची निघून गेली. त्यानंतर सोयाबीनवर नांगर फिरवावा लागला. कपाशीवर बोंडअळी व बोंडसडचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उरलीसुरली आशादेखील मावळली. यानंतर शेतकरी रबी हंगामातील गहू व हरभरा पेरणीकडे वळला. मात्र, यंदा डिसेंबरची सुरुवात झाली असताना शहानूर धरणातून गव्हासाठी पाणी देण्यात आलेले नाही. धरण १०० टक्के भरले असताना शेतकऱ्यांसाठी सिंचन विभागाकडून आजपर्यंत कोणतीही तरतूद केली नसल्यामुळे व कालव्याची कोणतीही दुरुस्ती केली नसल्यामुळे शेतकरी वर्गात सिंचन विभागविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गहू पेरणीचा हंगाम संपत असताना सिंचन विभागाकडून अद्याप कोणतीही तरतूद केली गेली नाही. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकरी हे यंदा गहू पेरणीपासून वंचित राहण्याची भीती शेतकरी दिलीप भोपळे यांनी व्यक्त केली.
---------------