अमरावती : जिल्ह्यातील लघुसिंचन योजना व जलस्त्रोतांची सहावी प्रगणना सुरू होत आहे. त्यासाठी आवश्यक तालुकास्तरीय समित्या स्थापन करून कार्यवाहीला चालना द्यावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी मंगळवारी येथे दिले.
लघुसिंचन योजना व जलस्त्रोतांची सहावी प्रणगना जिल्हास्तरीय समितीची ऑनलाईन बैठक सिद्धभट्टी यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी ते बोलत होते. सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप निपाणे यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रगणनेचे काम प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी तालुका समित्या कार्यान्वित होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही कार्यवाही तत्काळ पूर्ण करा. या कामासाठी जलसंपदा, जलसंधारण, जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभागासह ग्रामस्तरावर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांनाही सहभागी करून घ्यावे. त्याचप्रमाणे, क्षेत्रीय किंवा पर्यवेक्षकीय कामासाठी इतरही मनुष्यबळ मिळवण्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही करावी. या गणनेसाठी प्रगणकांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
भूपृष्ठाखालील जलसाठ्याच्या वापरासाठी साध्या विहिरी, उथळ, मध्यम व खोल कूपनलिका, भूपृष्ठावरील जलसाठ्याच्या वापरासाठी २ हजार हेक्टर सिंचन क्षमतेचे लघुसिंचन योजना, धरण, कालवे, बंधारे, विमोचक, बंद नलिका वितरण प्रणाली आदींमुळे केले जाणारे प्रवाही सिंचन आणि नदी, नाले, बंधारे, जलाशय आदींवरील उपसा सिंचन योजना, नागरी व ग्रामीण भागातील जलसाठे व २ हजार हेक्टरवरील सिंचन क्षमतेचे मोठे मध्यम प्रकल्प, उपसा सिंचन योजना, तसेच कृषी व मृदसंधारण विभागातील सिमेंट बंधारे, शेततळे, सिंचन विहीरी, भूजल सर्वेक्षण यंत्रणेशी संबंधित कूपनलिका आदी बाबींची प्रणगना होणार आहे, अशी माहिती निपाने यांनी दिली.
-----------------
(ही स्वतंत्र बातमी आहे)
आला पावसाळा आरोग्य सांभाळा....
आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाच्या सूचना
अमरावती : पावसाळ्यात डेंग्यूसारख्या आजारापासून दूर राहण्यासाठी घरात किंवा घराच्या परिसरात डास असता कामा नये. त्यासाठी घरालगतच्या पाणी साचलेल्या साठ्यांत गप्पी मासे पाळणे, कोरडा दिवस पाळणे, साठवणुकीच्या भांड्यांतील पाणी बदलत राहणे आदी सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. मानवातील डेंग्यूचा संसर्ग हा विषाणूबाधित एडीस इजिप्ती डास चावल्याने होतो. ते डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात आणि ते दिवसा चावतात. विषाणूबाधित डासाने चावा घेतल्यानंतर लक्षणे ५ ते ६ दिवसांच्या अधिशयन काळात दिसून येतात. मात्र, अनेकदा हा काळ ३ ते १० दिवसापर्यंतचा असू शकतो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी सांगितले.
ही आहेत लक्षणे
अचानक ताप येणे, डोकेदुखी, जास्त अंगदुखी, सांधेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, भूक मंदावणे, मळमळणे, पोटदुखीसारखी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. अंगावरील दर्शनी भागावर जर त्वचेवर पूरळ दिसून येत असतील जसे चेहरा, कान व हातपाय तर यावरून या तापाचे निदान केले जाते. कधी नाकातून, हिरड्यांतून व गुदमार्गातून रक्तस्त्राव, अशी लक्षणे आढळून येतात. परंतु अशी लक्षणे क्वचित आढळतात. यापैकी कुठलेही लक्षणे असल्यास तत्काळ तपासून घेणे आवश्यक असते.
-------------------
प्रतिबंध कसा कराल?
ताप आलेल्या व्यक्तीचा त्वरित हिवतापासाठी रक्तनमुना घेऊन तपासणीसाठी पाठविणे, गावाची धूरफवारणी करून घेणे, रूग्णालयामध्ये विषाणू परीक्षणासाठी पाठविणे,भांडयामध्ये अळ्या आढळून आल्यास ती सर्व भांडी रिकामी करून स्वच्छ धुवून टाकावी,जे भांडे खाली करू शकत नाही, अशा भांड्यामध्ये टेमिफॉस टाकावे. गप्पी मासे गावातील वापरात नसलेली विहीर, पाणी साचलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडावे. घरातील कूलर व फुलदाण्याचे पाणी नियमित बदलावे. साचलेल्या नाल्या वाहत्या कराव्यात. जेथे वाहते करणे शक्य नाही अशा ठिकाणावर जळलेले ऑईल टाकावे. संडासचे व्हेंटपाईपला पातळ नायलॉनी पिशवी बांधावी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा व खिडक्यांना जाळी बसविण्यात यावी. डासांचा नायनाट करणा-या विविध उयापयोजना कराव्या.
---------------------
आरोग्य शिक्षण
आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. पाणी साठलेले भांडे व्यवस्थित झाकून ठेवावे. घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. घरावर असणारे टायर, नारळाच्या करवंट्या, कुंडीतील पाणी हे आठवड्याला रिकामे करावे व वापरात नसणारे टाकाऊ साहित्य, अडगळीत ठेवू नये, अशी सूचना आरोग्य विभागाने केली आहे.