अमरावती : जिल्हाभरातील रुग्णसेवेचा भार उचलणाऱ्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी शासनाकडे विशेष निधी मंजूर केला आहे. मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात मंजूर ४५ कोटींचा निधी निर्गमित होऊन इर्विन, डफरीनचे बळकटीकरण केले जाईल, अशी माहिती आ. सुनील देशमुख यांनी येथे सोमवारी दिली.येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम, रस्ते निर्मितीचा आढावा घेतला असता त्यांनी ही माहिती दिली. आ. देशमुख यांच्या मते, डफरीनची १८९ खाटांची अपुरी संख्या लक्षात घेता ती २०० खाटांची करण्यासाठी २८ आॅगस्ट २००९ मध्ये शासनाने मंजुरी दिली होती.मात्र मागील पाच वर्षांचा कार्यकाळात या इमारतींना प्रशासकीय गती देण्यात आली नाही. त्यामुळे नागपूर विधिमंडळात ही बाब आवर्जून उपस्थित करुन मंजूर ४५ कोटी रुपये निर्गमित होताच इर्विन, डफरीनचा कायापालट होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच एआरएचएम अंतर्गत शहरात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासनाने २०१३ रोजी २८ कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु हा निधी आजतागायत अखर्चित असून हा निधी मिळाल्यास इर्विन, डफरीनच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण, दुरुस्ती, रस्ते, द्वार उभारणी आणि निवासस्थानाची कामे केली जाणार आहे. त्याचप्रमाणे वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता काही प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे ठरविले आहे. हे मार्ग केंद्रीय रस्ते अनुदानातून केले जाणार असून पाठपुरावा केला जात आहे. यात पंचवटी चौक ते नवसारी, पंचवटी चौक ते इर्विन चौक, रेल्वे स्टेशन चौक ते इर्विन, चपराशी पुरा ते रेल्वे स्टेशन, मालवीय चौक ते इतवारा बाजारपर्यत रस्ते निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मालवीय चौक ते नागपुरी गेट पर्यत १.३ कि.मी. च्या उड्डाणपुलाचे कार्य प्रस्तावित असून त्याकरिता ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त बांधकाम विभागातर्फे फॉरेन्सिक लॅब, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे बांधकाम, विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यायच्या मुलींचे वसतिगृह, पंजाबराव प्रबोधिनी, न्यायालयाची इमारत, जिल्हा नियोजन भवन आदी विकास कामांचा आढावा घेण्यात आला. अर्जुननगर परिसरातील वाहून जाणारे सांडपाणी, मालवीय चौकात तुंबणारे पावसाचे पाणी व संदर्भ सेवा टप्पा क्र. २ चे कामे गतीने करावीत, असे आ. देशमुख यांनी सुचविले. विकास कामंचा दर्जा उत्तम मिळावा, अन्यथा अधिकाऱ्यांनी खैर नाही अशी तंबीदेखील त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. यावेळी 'बी अॅन्ड सी' चे अधीक्षक अभियंता विजय बनगिनवार, कार्यकारी अभियंता भानोसे, एन. आर. देशमुख, उपअभियंता डी.के. देशमुख, अनिल जवंजाळ, चेतवानी, विनोेद शिरभाते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इर्विन, डफरीनचा होणार कायापालट
By admin | Published: February 02, 2015 10:57 PM