प्रशासनाचे दुर्लक्ष : रूग्णांच्या नातेवाईकांचेही आरोग्य धोक्यात लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात सर्वत्र अस्वच्छतेचा कहर पसरला आहे. येथे येणारे रूग्णांचे नातेवाईक व इतर कर्मचारी धूम्रपान करून भिंतीवरच थुंकत असल्यामुळे रूग्णांच्या आरोग्यला धोका निर्माण झाला आहे. याकडे मात्र इर्विन प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून जिल्हा शल्यचिकित्सक अरूण राऊत यांनी लक्ष घालावे, अशी मागणी रूग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. इर्विन रूग्णालयाच्या गेटजवळ घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बुधवारी प्रतिनिधीने फेरफटका मारला असता, याठिकाणी सांडपाणी साचले होते. बाहेरील मोकाट श्वानांचा मुक्त संचार सुरू होता. प्रवेशव्दाजवळच पोलीस चौकी आहे. या चौकीजवळील भिंत धूम्रपानाच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेली निदर्शनास आली. अनेक वार्डात घाणीचे साम्राज दिसून आले. या परिसरातही रूग्णांचे नातवाईक जेवण करतात आणि उष्टे येथेच ते टाकतात. रोज इर्विन रूग्णालयातील सफाई कामगारांकडून स्वच्छता होत नसल्याने अन्नाचे तुकडे येथेच पडून राहतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. सडलेल्या व वेस्टेज पदार्थांची दुर्गंधी येत आहे. येथे रोज शेकडो विविध आजारांचे रूग्ण उपचार दाखल होतात. हे सर्व रूग्ण गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना या ठिकाणी नाईलाजाने उपचार घ्यावा लागतो. पण त्यांना मात्र सुविधा मिळत नाही. स्वच्छतेवर लाखो रूपये खर्च करण्यात येतात. मात्र नेहमीच परिस्थिती मात्र जैसे थे असते. येथे येणाऱ्या रूग्णांचे उपचारानंतर आरोग्य सुधारते. मात्र नातेवाईकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. परिसरात घाण असल्याने संसर्गजन्य आजार उद्भवू शकतो. या प्रकाराला जिल्हा शल्यचिकित्सक अरूण राऊत यांनी आळा घालावा व संबंधितांवर कारवाई करून रूग्णालयात स्वच्छता राहण्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता ठेवावी, अशी मागणी होत आहे. कधी होणार स्वच्छता ? जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हाभरातील रूग्ण उपचार घेण्यासाठी येतात. या ठिकाणी इमरजन्सी रूग्ण नेहमीच दाखल होतात. परंतु रूग्णालयाच्या विविध वॉर्डची नियमित स्वच्छता होत नसल्याने रूग्णांना इन्फेकश्न होतेच पण त्यांच्यासोबत आलेल्या नातेवार्इंकाचेही आरोग्य धोक्यात येते. ते या ठिकाणी आजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणाने रूगणालयाची दिवसातून रोज दोन वेळा स्वच्छता करणे गरजेचे झाले आहे. तेव्हा या रूग्णालयाच्या अस्वच्छतेचा प्रश्न केव्हा निकाला लागणार असा सवाल विचारला जात आहे. स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी नेमण्यात आले आहेत. दैनंदिन स्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. नागरिकांनीसुद्धा सहकार्य करणे अपेक्षित आहे. - अरूण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक
‘इर्विन’ आजारी!
By admin | Published: June 19, 2017 12:11 AM