उज्ज्वल भालेकर लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील ओपीडीमध्ये बेडची संख्या कमी असल्याने बेडसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची चांगलीच धावपळ झाली. शनिवारी रुग्णालयात एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले. तसेच ओपीडीमध्ये डॉक्टर राहत नसल्याने वेळेत उपचार मिळत नसल्याची ओरडही यावेळी काही रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात आली. इर्विन रुग्णालयात रोज शेकडो विविध आजाराने ग्रासलेले तसेच अपघातग्रस्त रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. परंतु, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत रुग्णालयातील सोयी-सुविधा या अपुऱ्या पडत आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत असल्याचे चित्र रुग्णालयात पाहायला मिळत आहे. शनिवारी रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने एका बेडवर दोन रुग्ण ठेवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली होती. तसेच या ठिकाणी वेळेवर डॉक्टरही नसल्याने उपचार मिळण्यास उशीर होत असल्याचा आरोप काही रुग्णांच्या नातेवाइकांनी करीत रुग्णालय प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला.
दोन तास डॉक्टरांची प्रतीक्षा इर्विन रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या महिलांचीही वेळेत तपासणी होत नसल्याची माहिती महिलांनी दिली. संबंधित तज्ज्ञ डॉक्टर व येथील कर्मचाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही दोन ते तीन तास डॉक्टरांची वाट पाहावी लागल्याचे तपासणीसाठी आलेल्या महिलांचे म्हणणे आहे.
सर्वत्र दुर्गंधीइर्विन रुग्णालयातील अनेक वॉर्डांमध्ये कमालीची दुर्गंधी पसरली आहे. त्याचा दर्प रुग्ण व नातेवाइकांमध्ये झिणझिण्या उठवितात. याशिवाय परिसरातही ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. त्याठिकाणी सफाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
रुग्णालयात मनुष्यबळाची कमी आहे. त्यामुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांची तसेच डॉक्टरांची धावपळ होते. शनिवारी आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे अमरावतीमध्ये आल्या होत्या. त्यांनाही रुग्णालयात मनुष्यबळ कमी असल्याची माहिती दिली. - नरेंद्र सोळंके, आरएमओ, इर्विन