लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महाराष्ट्र म्हणजे केवळ मुंबई, पुणे आणि नागपूरच आहे काय...? असा संतप्त सवाल उपस्थित करून विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या तोंडाला सपशेल पाणी पुसल्याचे ताशेरे माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी ओढले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत वर्ष २०२४-२५ करिता सादर केलेल्या अर्थसंकल्पात एका बाजूने विद्यमान सरकारला टेकू दिलेले आंध्र प्रदेश व बिहारवर प्रचंड निधीचा वर्षाव करण्यात आलेला आहे. याउलट केंद्रीय करांमध्ये सर्वाधिक वाटा देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला सपशेल पाने पुसली. यावर 'कोण म्हणतो काहीच नाही..?' असा कोडगा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना विचारला. वस्तुतः महाराष्ट्रातील केवळ मुंबई, पुणे व नागपूर येथील मेट्रो प्रकल्प, मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) नागपूर मेट्रो, नागपूर नाग नदी प्रकल्प, पुणे मेट्रो, पुणे मुळा-मुठा संवर्धन प्रकल्प यांना वगळता विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राला कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.
विदर्भासाठी सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पाला फुटकी कवडीसुद्धा दिली नाही. शेतकऱ्यांसाठी साधे पॅकेज तर सोडा, याबद्दल अवाक्षरही अर्थसंकल्पात नाही. याऊलट मुंबई, पुणे, नागपुरातील प्रकल्पांकरिता साधारणतः ५३३१ कोटी रुपये तर याउलट विदर्भ, मराठवाडा येथील सिंचन प्रकल्पांसाठी केवळ ६०० कोटींची तरतूद केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या सिंचनाचा अनुशेष अद्यापही भरून निघालेला नसताना किमान एकरकमी ५००० कोटी रुपये तरतूद यावर करणे अपेक्षित होते. लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह ग्रामीण महाराष्ट्राने भाजपला सपशेल हद्दपार केले. याचा सूड केंद्रातील मोदी-शहा जोडी नागरिकांवर उगवत आहे काय, असा संतप्त सवालसुद्धा या अर्थसंकल्पाच्या तरतुदींवरून डॉ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला आहे.