अमरावती : रस्ता क्रॉस करीत असताना एका दुचाकीने इसमाला जबर धडक दिल्याने इसम ठार झाल्याची घटना राजापेठ ठाणे हद्दीतील सुपर एक्स्प्रेस हायवेवर जाधव इंडस्ट्रीजनजीक शुक्रवारी रात्री घडली.
बिबराज जीवन जावरकर ( रा. बेरदा भुरू, ता. धारणी) असे मृताचे नाव आहे. तो एमआयडीसी परिसरात राहत होता. बिबराज व त्याचा मित्र शिवम नंदकिशोर धांडे हे सुपर हायवेवर जाधव इंडस्ट्रीजवळील रस्ता ओलांडत असताना बडनेराकडे जाणाऱ्या दुचाकीने धडक दिली. जखमीला मित्राने तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रूपेश नंदकिशोर भिलावेकर (२१, रा. बेरदा भुरू, ता. धारणी) यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी एमएच २४ बीएम १६३९ क्रमांकाच्या दुचाकीच्या चालकाविरुद्ध शनिवारी भादंविचे कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला.