अमरावती : रेल्वेने रुळाखाली कटून झालेल्या अपघातात ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरीगेट ठाणे हद्दीतील सहकार प्लॅसमागील रेल्वेरुळावर २५ मार्च रोजी घडली. याप्रकरणी नागपुरीगेट पोलिसांनी शनिवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. बाबुराव नामदेव इंगळे (४५, रा. माधान ता. चांदूरबाजार) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या मुलाचे बयाण पोलिसांनी नोंदविले.
----------------------------------------------------------
इसमास काठीने मारहाण
अमरावती : बहिणीसोबत भांडण का करतो, या कारणावरून आरोपीने एका इसमाला काठीने मारहाण केल्याची घटना बडनेरा ठाणे हद्दीतील नवी वस्ती परिसरात २६ मार्च रोजी घडली. याप्रकरणी आरोपी चंदू उत्तमराव जगताप (३२, रा. गोपालनगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला. फिर्यादी संतोष हनुमंतराव सूर्यवंशी (५४, रा. नवी वस्ती) विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
------------------------------------------
४४ हजारांचे बॅटरी सेल लंपास
अमरावती : बीएसएनएल मोबाईल टावर व एक्सचेंच्या इमारतीत बसविलेली जुनी ४४ हजार ४० रुपये किमतीची २४ बॅटरी सेलची चोरी अज्ञात आरोपीने केली. ही घटना बिझिलॅन्ड मार्केटमध्ये घडली. या प्रकरणी कनिष्ठ दूरसंचार अधिकारी नीलेश वासुदेव ठाकरे यांनी तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------------------------------------
डोक्यावर दारूची बॉटली फोडली
अमरावती : दारू पिण्यासंदर्भात हटकले असता आरोपींनी संगनमत करून युवकाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडून जखमी केल्याची घटना कठोरा मार्गावरील शेतात १९ मार्च रोजी घडली. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी २६ मार्च रोजी चार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदविला. फिर्यादी सचिन नानासाहेब भामकर (३५, रा. राठीनगर) यांनी तक्रार नोंदविली.
--------------------------------------------------------------
दोन सायकली लंपास
अमरावती : बहिणीकडे वास्तूशांतीकरिता फिर्यादी गेले असता अज्ञात चोरट्याने १२०० रुपये किमतीच्या दोन सायकली चोरून नेल्याची घटना सत्यदेव फर्निचर गाडगेनगरजवळ २१ मार्च रोजी घडली. या प्रकरणी शनिवारी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.