बडनेऱ्यातील नगरसेवक एकवटले : यापूर्वीच्या ठरावाची दिली आठवण अमरावती : १९८३ साली स्थापन झालेल्या अमरावती महापालिकेचे अमरावती-बडनेरा असे नामकरण करण्यात यावे, हा मुद्दा शुक्रवारी पुन्हा गाजला. हा प्रश्न पोटतिडकीने मांडण्यासाठी बडनेऱ्यातील सर्व पक्षीय नगरसेवकांनी एकजुटीचे प्रदर्शन केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासनाखाली शुक्रवारी आमसभा पार पडली. यावेळी पीठासीनावर उपमहापौर शेख जफर शेख जब्बार, आयुक्त चंद्रकात गुडेवार, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाज सांभाळले. दरम्यान प्रश्नोत्तराच्या तासात युवा स्वाभिमान संघटनेचे सदस्य विजय नागपुरे यांनी ‘अमरावती- बडनेरा महापालिका’ असे नामकरण करण्यात यावे, हा मुद्दा रेटून धरला. कल्याण- डोंबिवली, नांदेड- वाघाडा असे महापालिकांचे नामविस्तार झाले असताना अमरावती- बडनेरा असे महापालिकेचे नामकरण का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नागपुरे यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला पांठिबा दर्शविण्यासाठी काँग्रेसच्या कांचन ग्रेसपुंजे, राष्ट्रवादी फ्रंटच्या जयश्री मोरे, जावेद मेमन, रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, बसपाच्या गटनेत्या गुंफाबाई मेश्राम, भाजपच्या छायाताई अंबाडकर हे पुढे आले. यावेळी कांचन ग्रेसपुंजे, प्रकाश बनसोड यांनी १९९७ आणि २००२ साली झालेल्या नामविस्तार ठराव मान्यतेची आठवण करुन दिली. अमरावती- बडनेरा महापालिका असे संयुक्त नामकरणाचा विषय आला की, हा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित असल्याचे उत्तर दिले जाते. हा नामकरणाचा प्रस्ताव शासन स्तरावर का प्रलंबित आहे, याचा पाठपुरावा शासनाने केला अथवा नाही, हे नगरसेवकांना कळू द्यावे, असे नागपुरे म्हणाले. अमरावती- बडनेरा नामविस्ताराची मागणी प्रलंबित असताना ती मार्गी लागावी, यासाठी बडेनऱ्यातील नगरसेवकांनी दाखविलेल्या एकीच्या बळापुढे सभागृहातील अन्य सदस्य अवाक् झालेत, हे विशेष. नगरसेवक हा प्रश्न जिद्दीने मांडत असताना सभागृहात काही सदस्यांनी जास्त वेळ चर्चा होत असल्याची बाब उपस्थित केली. अखेर विलास इंगोले, अविनाश मार्डीकर यांनी मध्यस्थी करून या वादावर पडदा टाकला. प्रकाश बनसोड, कांचन ग्रेसपुंजे, विजय नागपुरे, जयश्री मोरे यांनी या मुद्दावर आक्रमकता दाखविली. (प्रतिनिधी)
अमरावती-बडनेरा महापालिका नामकरणाचा मुद्दा पुन्हा गाजला
By admin | Published: November 21, 2015 12:18 AM