देवेंद्र भुयार, सुधारित प्रस्ताव दोन महिन्यात सादर करण्याचे वडेट्टीवार यांचे निर्देश
वरूड : १९९१ मध्ये वरूड तालुक्यात आलेल्या पुरामध्ये ३१गावे बाधित होती. त्यापैकी काही गावांचा निळ्या पट्ट्यात समावेश असल्याने येथील लाभार्थी मूलभूत सोयी व सुविधांपासून वंचित राहत आहेत. या गावात करावयाची कामे व निळा पट्ट्याबाबतच्या सूचनांचा अभ्यास करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
यांनी दिल्यानंतर या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. आ. देवेंद्र भुयार यांनी हा प्रश्न मंत्रालयात लावून धरला होता.
वरूड तालुक्यातील सन १९९१ मध्ये आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या हातुर्णा, पळसवाडा, भापकी, या गावांचे विशेष बाब म्हणून सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन नागरी सुविधाबाबत पुरवून घर बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे रेटून धरली. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पूरबाधित ३१ गावांमध्ये पुनर्वसन करताना देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा देण्याबाबतच्या कामांबाबत सुधारित परिपूर्ण प्रस्ताव दोन महिन्यांचा कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनाने सादर करावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. बैठकीमध्ये १० वर्षांपासून शासन दरबारी हा प्रस्ताव धूळखात असल्याने आमदार देवेंद्र भुयार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, अमरावती जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित होते.