लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद समाजकल्याण समितीमार्फत जिल्हा निधीतून अनुदानावर विविध साहित्याचा पुरवठा मागासवर्गीय लाभार्थ्याना केला जातो. मात्र, यंदा यातून शिलाई मशीन व सायकल पुरवठा वगळण्यात आल्याने समिती सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते.जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सन २०१९-२० या आर्थिक वर्षात २० टक्के अनुदानावर मागासवर्गीय घटकातील लाभार्थींच्या उत्थानासाठी विविध प्रकारचे साहित्य अनुदान तत्त्वावर वितरित केले जाते. याकरिता आर्थिक तरतूद केली जाते. यावर्षी शिलाई मशीन व सायकल पुरवठा करण्यासाठी प्रत्येकी दहा लाख याप्रमाणे तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, शिलाई मशीन व सायकल पुरवठा टाळून त्याऐवजी मागासवर्गीय घटकातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी साहित्य पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी वरील साहित्याची तरतूद वळविण्यात आली होती. परिणामी मागासवर्गीय समाजातील महिला मुलींना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन अनुदानावर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याशिवाय शालेय शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना सायकल पुरविणेसुद्धा आवश्यक आहे. असे असताना समिती सदस्यांना विश्वासात न घेता शिलाई मशीन व सायकल हे दोन साहित्य पुरविण्याचा निर्णय का रद्द करण्यात आला, असा प्रश्न सदस्य शरद मोहोड यांनी समाज कल्याण समितीत उपस्थित केला. यावर इतरही सदस्यांनी आक्षेप घेता शिलाई मशीन व सायकलचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक तरतूद कायम ठेवून सदरचे साहित्य अनुदानावर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सदस्यांनी रेटून धरली. अखेर सदस्यांच्या भावना लक्षात घेता, समाजकल्याण समिती सभापती सुशीला कुकडे यांनी शिलाई मशीन व सायकल पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिल्याने हा मुद्दा निवळला. याशिवाय सभेत समिती सदस्यांच्या भत्याचा व निकृष्ट अल्पाहाराच्या मुद्द्यावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी समाजकल्याण विभागाच्या विविध योजना व प्रशासकीय कामकाजाचा आढावा सभापतींच्या उपस्थितीत घेण्यात आला.सभेला समाजकल्याण सभापती सुशीला कुकडे, सदस्य शरद मोहोड, पूजा येवले, गजानन राठोड व अन्य सदस्य तसेच डेप्युटी सीईओ तथा प्रभारी समाजकल्याण अधिकारी प्रशांत थोरात व समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
समाजकल्याण समितीत तापला शिलाई मशीनचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 1:48 AM
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सन २०१९-२० या आर्थिक वर्षात २० टक्के अनुदानावर मागासवर्गीय घटकातील लाभार्थींच्या उत्थानासाठी विविध प्रकारचे साहित्य अनुदान तत्त्वावर वितरित केले जाते. याकरिता आर्थिक तरतूद केली जाते.
ठळक मुद्देसदस्य आक्रमक : अखेर साहित्य पुरविण्याचा प्रस्ताव मंजूर