लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील हंगामामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने कपाशीचे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या हंगामापूर्वीच एकात्मिक कीड व्यवस्थापन आवश्यक आहे. यासाठी गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित करणे महत्त्वाचे असल्याचे कृषी विभागाने सांगीतले.कपाशी हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. यंदादेखील किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र कपाशी पिकासाठी प्रस्तावित आहे. त्यामुळे हंगामापूर्वी व्यवस्थापन करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.यासाठी मार्च-एप्रिल महिन्यात जमिनीची खोल नांगरणी करावी, जेणेकरून किडीच्या जमीनीत असलेल्या अवस्था (उदा. कोष) वर येऊन उन्हामुळे नष्ट होतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील, कपाशीची धसकटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खडयात टाकावीत. याप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण शेत तथा बांध स्वच्छ करण्यात यावे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी घेतलेल्या शेतात पुढील हंगामात कापूस लागवड करू नये, पूर्वी तृणधान्य, कडधान्य, गळितधान्य केलेली जमीन कापूस लागवडीसाठी निवडावी. या हंगामात कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रेफ्यूजी) कपाशीची लागवड करावी तसेच कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मुंग, झेंडू व एरंडी या मिश्र सापळा पिकांची एक ओळ लावावी. या प्रमाणे नियोजन केल्यास निश्चितच गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण करणे शक्य होणार आहे.शेतकऱ्यांनी कृषिसेवा केंद्रा कडून खात्रीच्या बियाण्याची खरेदी करावी व खरेदीची पावती घेऊन ती जतन करून ठेवावी तसेच पेरणीच्या वेळी पिशवी उलट्या बाजूने फाडून पिशवीवरील अत्यावश्यक माहिती जसे लॉट नंबर, वाण, स्वत:कडे जपून ठेवावी.कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी, जून महिन्यात लागवड करण्यात यावी. युरियाचा खताचा जास्त वापर टाळावा. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या तीन महिन्यापर्यंत कीटकनाशकाचा वापर टाळावा, जेणेकरून मित्रकिडीचे संरक्षण होईल. या काळात वनस्पतीजन्य कीटकनाशके, जैव कीटकनाशके, मित्र किडीचा वापर करावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यापासून नियोजन करून एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविणे सहज शक्य असल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले.प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही घ्यावी काळजीपिकांच्या लागवडी नंतर ४५ दिवसात फेरोमन ट्रॅप्सचा वापर हेक्टरी ५ या प्रमाणे वापर करावा व पिकांतील बदलाची निरीक्षणांची नोंद घ्यावी. पीक लागवडीपासून काढणीपर्यंत आठवड्याला पिकांमधील कीडरोगाचे व पिकांच्या अवस्थेचे सूक्ष्म अवलोकन केल्याने किडीच्या प्रादुभार्वाची तीव्रता पाहून आर्थिक नुकसानाची पातळी गाठली असल्यासच फक्त रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. रासायनिक किटकनाशकांचा वापर आवश्यता असेल तेव्हाच व शिफारस केल्याप्रमाणे करावा. अधिकाधिक कीटकनाशके एकत्र मिसळून फवारणी वा जास्त मात्रेत फवारणी घातक ठरू शकते, असे कृषी विभागाने सांगितले.
बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य; व्यवस्थापन महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:26 PM
मागील हंगामामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने कपाशीचे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या हंगामापूर्वीच एकात्मिक कीड व्यवस्थापन आवश्यक आहे.
ठळक मुद्देकृषी विभागाची माहिती : अळीचा जीवनक्रम खंडित करावा