मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : बंद रेल्वे फाटकाखालून दुचाकी, सायकल काढणे व पादचारी यापुढे जात असेल तर गुन्हा दाखल होणार आहे. सहा महिन्यात अशा १०७ कारवाया झाल्या. ७० किमीच्या अंतरात असलेल्या सहा रेल्वे फाटकांनजीक चार वर्षांत पाच लोकांचा जीव गेला आहे. नागपूर-मुबंई या मध्य रेल्वे मार्गावर पुलगाव ते बडनेरा अशा ७० किमीवर अंतरावर चिंचोली, धामणगाव, दीपोरी, चांदूररेल्वे, मालखेड, टिमटाळा असे सहा रेल्वे फाटक येतात. दत्तापूर-धामणगाव हे जुळे शहर दोन भागात विभागल्याने सायकलधारक असो की दुचाकीचालक वा पादचारी, समोर रेल्वे गाडी येत असताना फाटक ओलांडण्याची शर्यत लागलेली असते. हीच स्थिती चांदूर रेल्वे, चिंचोली रेल्वे फाटकाची आहे
दुचाकी होऊ शकते जप्तदुचाकी रेल्वे फाटकाच्या खाली तथा जवळ उभी केली वा रेल्वे फाटक ओलांडताना रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले, तर रेल्वे अधिनियम १५९ आणि १४७ नुसार कारवाई करण्यात येते. अशा वेळी आपली दुचाकी जप्त होऊ शकणार आहे.
१०७ जणांवर कारवाई रेल्वे फाटक बंद असताना खालून जाण्यास अनेकांची चढाओढ असते. रेल्वे पोलिसांनी अशा लोकांवर बारीक लक्ष ठेवत आतापर्यंत १०७ जणांवर कारवाई केली आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहे.
आतापर्यंत पाच जणांचा गेला बळीनागपूर-मुंबई या मध्य रेल्वे मार्गावर दर पाऊण ते एक तासात दोन ते तीन प्रवासी तथा मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे संबंधित सहा रेल्वे फाटक किमान आठ ते दहा मिनिटे बंद असतात. एखाद्या पानठेल्यावर दहा मिनिटे फालतू वेळ घालविणाऱ्यांना रेल्वे फाटक कमी वेळेसाठीही होऊ द्यायचे नसते. लगेच दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी अतिघाई करतात. पायी, सायकलने रेल्वे फाटक ओलांडताना मागील चार वर्षात पाच जणांचा बळी या सहा रेल्वे फाटकांनी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
रेल्वे फाटक बंद असताना दुचाकीधारक तथा पादचारी यांच्याकडून रेल्वे फाटक ओलांडणे धोकादायक तथा कायद्याने गुन्हा आहे. यात आपला जीव जाऊ शकतो. त्यामुळे कोणीही रेल्वे फाटक बंद असताना क्रॉस करू नये. - सी.एल. कनोजिया, निरीक्षक, आरपीएफ रेल्वे स्थानक, धामणगाव रेल्वे