अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अचलपूर शहराच्या परकोटाचे दरवाजे बंद करणे धोकादायक असून, त्यास हात लावायला केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची अनुमती आवश्यक ठरते. विभागाने या ऐतिहासिक व प्राचीन परकोट आणि दरवाजांना राष्ट्रीय महत्त्वाचे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या अनुषंगाने परकोटाचे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला गेला. यात खिडकी गेट बंद केले गेले, तर दुल्हा गेट बंद करण्याचा प्रयत्न झाला. खिडकी गेट एक ते दीड तासांतच उघडले गेले. या प्राचीन वास्तूंची बरीच पडझड झाली आहे. काही भाग जीर्ण झाला. त्याचा कुठला भाग पडेल, याच्या नेम उरलेला नाही. त्यामुळे हे दरवाजे बंद करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे होय.
पुरातत्व विभागाकडून या परिसरात फलक लावले गेले आहेत. लक्षवेधक अशा या फलकांवर हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांत सूचना देण्यात आल्या आहेत.
२०० मीटरपर्यंतच्या विनियमित क्षेत्रात परवानगी न घेता केलेले कार्य नियमाचे उल्लंघन असून, त्यासाठी दोन वर्षांपर्यंत कैद तसेच एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद असल्याचे फलकावर नमूद आहे.
दरम्यान, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाकडे महत्त्वपूर्ण मार्ग या दरवाजातूनच पुढे जातो. केवळ हे दरवाजे बंद करून आज अचलपूर शहर बंद होऊ शकत नाही परकोटाच्या भिंतीला अनेक ठिकाणी भगदाड पडले असून, त्यातूनही लोकांचे अवागमन सुरू राहते. परतवाडा शहरातील खासगी दवाखान्यात औषधोपचारासाठी जाण्यासही हेच दरवाजे, रस्ते महत्त्वपूर्ण ठरत असल्याने नागरिकांचा या कृतीला विरोध आहे.
अचलपूर शहरातील पराकोटाचे दरवाजे पोलिसांनी बंद केले असावेत. तेच याविषयी माहिती देऊ शकतील.
- मदन जाधव तहसीलदार अचलपूर
पराकोटाचे दरवाजे बंद करण्यास परवानगी दिलेली नाही. पण, त्याची दुरवस्था बघता पुरातत्त्व विभागाला सोबत घेऊन दुरुस्ती करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी संमती दिली आहे.
- संदीपकुमार अपार, एसडीओ,
अचलपूर