लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसेवेच्या उदात्त हेतूने संत गाडगेबाबांनी मिशनची स्थापना केली. मिशनचे हे कार्य अविरत चालू ठेवून संत गाडगेबाबांनी दिलेला लोकसेवेचा वसा जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्ष ना. ॲड. यशोमती ठाकूर यांनी शनिवारी दर्यापूर येथे केले.श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचालित दर्यापूर येथील श्री संत गाडगे महाराज बाल सुधारगृहाच्या इमारतीचा जीर्णोद्धार पालकमंत्र्यांनी स्वखर्चातून केला. इमारत उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार बळवंत वानखडे, मिशनचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, हरिभाऊ मोहोड, बाल सुधारगृहाचे व्यवस्थापक गजाननराव देशमुख आदी उपस्थित होते. बालसुधारगृहाला ७५ वर्षे पूर्ण झाली. ही इमारत मोडकळीला आली होती. पालकमंत्र्यांनी स्वखर्चातून जीर्णोद्धार केला. हे काम लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांनी लक्ष घालून पाठपुरावाही केला. त्यामुळे इमारतीला नूतन रूप लाभले आहे, असे आमदार बळवंत वानखडे यांनी सांगितले.इमारतीच्या नूतनीकरणासाठी योगदान देणाऱ्या मूर्तिकार गोपाळ पवार, सलीम खान, सुभाष पनपालिया, देवानंद फुके, सुरेश गारोळे, सुधाकर भारसाकळे आदींना यावेळी गौरविण्यात आले.