लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे. तो अतिक्रमित असला तरीही त्याला घर बांधण्याचा पूर्ण हक्क आहे. याकरिता महाविकास आघाडीने घेतलेल्या धोरणानुसार नागरिकांच्या अतिक्रमित जागा नियमानुकूल करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. यावेळी ४७ कुटुंबांना एफ क्लासमधील ८ अ चे पट्टे त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.तालुक्यातील देऊरवाडा येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिवन क्लास उद्योग केंद्राचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देऊरवाडा येथील ४७ नागरिकांचे एफ क्लास जमिनीवर असलेले अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना हातोहात ८ अ चे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य सुनीता झिंगरे, सरपंच ललिता गायगोले, उपसरपंच आरशिया अंजुम, दीपक भोंगाडे, मोहोड, साहेबराव निमकर, छत्रपती केदार, सुरेंद्र सोनार, शेर मोहम्मद, वृषाली आवारे, रवि पवार, संजय भलावी आदी उपस्थित होते.यासोबतच सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ग्रामीण भागात महिलांसाठी रोजगारनिर्मिती व्हावी या अनुषंगाने देऊरवाडा शिवण क्लास उद्योग केंद्राचे उद्घाटन जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात छोट्या छोट्या व्यवसायांचे जाळे उभारून महिलांना रोजगार देणे आवश्यक आहे. त्यासाठी गावोगाव शिवणकाम व इतरही विविध रोजगारक्षम कौशल्यांचा विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तालुक्यात देऊरवाडा, जवळा शहापूर आदी गावांत आधुनिक शिलाई मशीनद्वारे कपडे शिवून तयार करण्याचे प्रशिक्षण उपक्रम व शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. देऊरवाडा येथे काही वर्षांपासून ४७ कुटुंब एफ क्लास जमिनीवर राहत होते. मात्र, त्यांच्याकडे हक्काचे घर नसल्याने स्थानिक दीपक भोंगाडे यांनी ही बाब ना.कडू यांच्याकडे पाठपुरावा करून हक्काची जागा या कुटुंबांना उपलब्ध करून दिली.