अमरावती : इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या जुन्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाची उजळणी होण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सेतु अभ्यासक्रमाच्या (ब्रिज कोर्स) विनामूल्य पीडीएफ फाइलची नोट्स स्वरूपात सर्रास विक्री होत आहे. अनेक शाळांमधून या अभ्यासक्रमासाठी तयार केलेल्या पुस्तिकेच्या प्रिंटआउट घेऊन येण्याच्या सूचना केल्या जात असून, शहरातील झेरॉक्स सेंटर, ग्राफिक्स सेंटर, कम्प्यूटर सेंटर आणि पुस्तकांच्या दुकानामध्ये तसेच काही शिक्षक कडून १०० ते ५०० रुपयांमध्ये पाठ्यपुस्तकांप्रमाणे या पुस्तिका सहज उपलब्ध केल्या जात आहेत. त्यामुळे पालकांना वह्या-पुस्तकांसह या सेतु अभ्यासक्रमाच्या पुस्तिकेसाठी पुन्हा नव्याने खर्च करावा लागत आहे.
करोनामुळे २०२०-२१ या गेल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या गतवर्षीच्या इयत्तांमधील पाठ्यक्रमाची उजळणी व्हावी, यासाठी ४५ दिवसांचा सेतु अभ्यासक्रम आखण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून झाली आहे. मात्र, शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळांनी अनेक विद्यार्थ्यांची जुन्या इयत्तेची पुस्तके जमा केली आहेत. असे असतानाच सेतु अभ्यासक्रमाच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची उजळणी होण्यासाठी हीच पुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दिले. त्यामुळे शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, सेतु अभ्यासक्रमाचा खोळंबा झाला आहे. ही परिस्थिती ताजी असतानाच, सेतु अभ्यासक्रमासाठीच्या पीडीएफची विक्री पुस्तक स्वरूपात होत आहे. शहरासोबतच राज्यातील अनेक शहरांमधील झेराॅक्स सेंटरमध्ये इयत्ता दुसरी ते नववीचा पीडीएफ सेट विषयनिहाय विकला जात आहे. त्यासाठी १०० ते ५०० रुपये पालकांकडून आकारले जात आहेत. झेरॉक्स सेंटरसोबतच पुस्तकांच्या दुकानांनीही सेतु अभ्यासक्रमाच्या पीडीएफची पुस्तक स्वरूपात विक्री होत आहे.
बॉक्स
पीडीएफ ते पुस्तकापर्यंतचा प्रवास
एससीईआरटीने सेतू अभ्यासक्रमासाठी पीडीएफ फाइल तयार करून दिल्या आहेत. मात्र, या पीडीएफ फाईलमध्ये विषयानुसार पानांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्यूटरच्या स्क्रीनवर पीडीएफ वाचणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांना स्क्रीनवर वाचण्याचा कंटाळा येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी पीडीएफच्या प्रिंट काढण्याला सुरुवात झाली. मात्र, दोनच दिवसांत त्याचे रूपांतर नोट्स आणि पुस्तकात होऊन विक्रीला सुरुवात झाली.