बडनेरा : शनिवारपासून बडनेरा शहरातील मोदी दवाखान्याच्या लसीकरण केंद्राला लसींचा अत्यल्प पुरवठा होत असल्याने वयोवृद्धांना भर उन्हात आल्यापावली परत जाण्याची वेळ येत आहे. किती वेळा परत जायचे, असा सवाल करीत काहीसा गोंधळ या केंद्रावर शुक्रवारी उडाला. येथील पुरवठा वाढविण्यासंदर्भात संतप्त प्रतिक्रियादेखील उमटल्या.
एक लाख लोकवस्तीच्या बडनेरा शहरात ५ मार्च रोजी मोदी दवाखान्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीला सुरुवात झाली. येथे कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. सुरुवातीला ज्यांनी लस घेतली त्यांची आता दुसरा डोसची वेळ आली आहे. या केंद्रावर लस टोचून घेण्यासाठी उत्तम प्रतिसाद आहे. भर उन्हात वयोवृद्ध, ४५ वर्षांवरील तसेच फ्रन्टलाइन वर्कर्स लस घेण्यासाठी येत आहेत. त्या सर्वांना एक आठवड्यापासून परत जावे लागत आहे. मोदी दवाखान्याला जेमतेम लसीचा पुरवठा केला जात आहे. येथील लोकसंख्या व वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन लसींचा पुरवठा वाढविला पाहिजे. यासाठी नगरसेवकांनी देखील पाठपुरावा करावा. या केंद्रावर अधिकतर ज्येष्ठ नागरिकांचा लस टोचून घेण्याकडे कल आहे. तापत्या उन्हात यावे लागत असताना अत्यल्प साठा असल्याने बऱ्याच लोकांना परत जावे लागत आहे. या सर्व बाबींचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा व बडनेरा शहरात लसीचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी शहरवासीयांची आहे. शुक्रवारी लसीकरण केंद्रावर आलेल्या नागरिकांनी आम्ही लस घेतल्याशिवाय जाणारच नाही, असा पवित्रा घेतला. शेवटी लसीकरण केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या सर्वांचे मोबाईल नंबर घेऊन तुम्हाला लस आल्यावर तात्काळ कळवू, असे सांगितल्यानंतर लोक शांत झाले. त्याचप्रमाणे ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांच्यासाठी लसीचा स्वतंत्र टेबल असावा, अशी देखील ओरड या ठिकाणी पहावयास मिळाली.
बॉक्स
लसीकरणाच्या वेळेत बदल करा, उन्हाचा त्रास
उन्हाची तीव्रता वाढते आहे. लसीकरण केंद्रावर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी १० ते दुपारी ४ अशी लसीकरणाची वेळ आहे. ऊन व वयोवृद्धांचा विचार करून प्रशासनाने उन्हाळाभर सकाळच्या वेळेत लसीकरण करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली.