अमरावती : व्हॅलेंटाइन डे म्हणजे केवळ प्रियकर - प्रेयसी यांच्यात प्रेम व्यक्त करणारा दिवस, असा समज आहे. मात्र, व्हॅलेंटाइन डे हा आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण, पती-पत्नी यांच्यातील भावनिक नाते घट्ट करणारादेखील काही वर्षांपासून साजरा केला जातो. याच श्रृखंलेत व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला रविवारी तब्बल ५५ जोडप्यांनी रक्तदान करून पती-पत्नीच्या नात्यात अनोखे प्रेम दडल्याचं स्पष्ट केले.
येथील जाजोदिया परिवार व रक्तदान समितीच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर, मधुसूदन जाजोदिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थानिक श्री अग्रेसन भवनात पती-पत्नींसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे हे १६वे वर्ष आहे. यात अनेक जोडपी गत १६ वर्षांपासून निरंतरपणे रक्तदान करून पती-पत्नीच्या नात्यात प्रेमाचा भाव व्यक्त करताना आपल्या रक्ताने रुग्णांचे प्राण वाचावे, असा दृढ निश्चय करतात. व्हॅलेंटाइन डेनिमित्त पती-पत्नीसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन हा अनोखा उपक्रम चंद्रकुमार जाजोदिया हे निरंतरपणे घेत आहेत. त्यांच्या हाकेला तितक्याच तत्परतेने अंबानगरीत जोडपेदेखील धावून जातात, हे रक्तदानाच्या संख्येवरून दिसून येते. रविवारी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रशांत पाठक, प्रवीण जाजू, इद्रीस अली यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादीचे विभागीय समन्वयक संजय खोडके, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, महापालिकाविरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर, नगरसेवक प्रणय कुळकर्णी, अजय सारस्कर आदींनी शिबिराला भेटी देत आयोजनाबाबत स्तुती केली.
आंतरजातीय जोडप्यांचेही रक्तदान
प्रेमाला जात, धर्माच्या सीमा नाहीत, हे आम्ही १९९६ मध्ये लग्न करून दाखवून दिले. मी कासार समाजाचा, तर पत्नी ठाकूर आहे. मात्र, एकमेकांवर असलेले प्रेम हे दोन अपत्य झाल्यानंतरही आजतागायत कायम आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त आयोजित होणाऱ्या रक्तदान शिबिरात गत १६ वर्षांपासून निरंतरपणे रक्तदान करून पती-पत्नीच्या नात्यात असलेल्या प्रेमाचा भाव व्यक्त केला जातो. आपल्या रक्तातून गरीब, सामान्य रुग्णांचे प्राण वाचावे, असा मानस असल्याचे वैशाली व आशिष तांबट या जोडप्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
रक्तदानाचे मोल नाही
पती-पत्नीने एकत्र येऊन रक्तदान करणे हा योग अविस्मरणीय आहे. खरे तर रक्तदानाचे मोल असू शकत नाही. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन ही मोठी बाब आहे. या शिबिरात आम्हाला रक्तदान करण्याचा योग आला, हे आमचे भाग्य आहे. यामाध्यमातून समाजाला नवी दिशा मिळेल, हेच व्हॅलेंटाईन आहे अशा भावना डॉ. शमा साजिया व डॉ. रवी भूषण या जोडप्यांनी व्यक्त केल्या.
रक्तदान हेच जीवनदान
रक्तदान हे जाती, धर्माच्या पलीकडील सामाजिक कार्य आहे, पती-पत्नी आम्ही दोघेही एकत्रपणे पाचव्यांदा रक्तदान करीत आहोत. रक्तदान हेच जीवनदान असून, आमच्या रक्ताने कुणाचे प्राण वाचत असेल हेच खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन ठरेल. त्यामुळे प्रत्येकांनी रक्तदान करून या सामाजिक चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन संजय शेरेकर आणि नीलू शेरेकर या जोडप्यांनी केले आहे.