अमरावती : महापालिकेने बीओटी तत्वावर साकारलेल्या जे अॅन्ड डी मॉलमध्ये १३ दुकानदारांना ताबा द्यावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे जुन्या द्वारकानाथ अरोरा मार्केटमधील दुकानदारांना न्याय मिळाला आहे.महापालिकेने वीर वामनराव जोशी व द्वारकानाथ अरोरा मार्केटच्या जागेवर नव्याने बीओटी तत्वावर मॉल उभारला आहे. हे मॉल ३० वर्षांच्या करारनाम्यावर देण्यात आले असून देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविली आहे. मॉल निर्मित झाल्यानंतर जुन्या मार्केटमधील दुकानदारांना ताबा देताना कंत्राटदारासोबत ‘ट्राय पार्टी’ करारनामा करणे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदाराशी ‘ट्राय पार्टी’ करारनामा द्वारकानाथ अरोरा मार्केटमधील दुकानदारांना अमान्य होता. परिणामी जुन्या द्वारकानाथ अरोरा मार्केमधील १३ दुकानादारंनी न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली. रिट याचिका क्र. २७१८/ २०१३ यानुसार न्यायालयाने याचिकेची सुनावणी करताना १३ दुकानदारांना ताबा देण्याचा निर्णय घेतला आहे. न्या. बी. पी. धर्माधिकारी, ए. पी. भांगळे यांनी दुकानापासून वंचित ठेवलेल्यांना लवकर ताबा देण्यात यावा, असे आदेशीत केले आहे. यात गुराबाई मतानी, विशनदास सायता, बशकराम वासवानी, गोपाल सचदेव, निलकमल मतानी, विजय तरडेजा, ईश्वरलाल वर्मा, गुरुमुखदास मतानी, दयानंद पोपली, सुधीर तरडेजा, कांता मोटवानी, महेंद्र घुडींयाल, चंदनलाल तरडेजा यांना जे अॅन्ड डी मॉलमध्ये ताबा मिळणार आहे.
‘जे अॅन्ड डी’ च्या १३ दुकानदारांना मिळणार ताबा
By admin | Published: March 30, 2015 12:12 AM