अंजनगाव सुर्जी/परतवाडा (अमरावती) : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा देवी येथील श्री जगदंबा देवी एक शक्तिपीठ असून महात्मा गांधींकडून खास उल्लेखित स्थळ ठरले आहे. भाविकांसह पर्यटकांची दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी होत आहे. पंचक्रोशीसह राज्यभरातून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत.
मुऱ्हा देवी मंदिराला ८०० वर्षाचा इतिहास आहे. पौराणिक वैभव प्राप्त आहे. येथील शक्तिदेवी शिल्पाची रचना काळ्या पाषाणातील आहे. ते योगमुद्रेतील, द्विभुज, पद्मासनातील शिल्प आहे. मुकुटाशिवाय अंगावर कोणतेही अलंकार नाहीत. मूर्तीला वज्रलेप देण्यात आला असल्याची माहिती डेक्कन कॉलेज पुणे येथील पुरातत्त्व विभागातील तत्कालीन अभ्यासक बालाजी शिवाजी गाजूल यांनी संस्थानला दिली आहे.
प्रतापराव गुजरांनी घेतले होते दर्शन
छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची स्वारी लूट करून अचलपूरच्या दिशेने जाताना मुऱ्हा देवीचे त्यांनी दर्शन घेतले होते. त्यांनी आपल्यासोबत लुटून आणलेल्या खजिना मंदिर परिसरातील विहिरीत लपविल्याची आख्यायिका आहे.
पायदळ वारी
घटस्थापनेनंतर नवरात्रात या ठिकाणी अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, आकोट तालुक्यातून अनेक भक्त पायी वारीने येतात. भल्या पहाटे देवीचे दर्शनही घेतात.
संत झिंग्राजी महाराज
मंदिर परिसरात श्री संत झिंग्राजी महाराजांची समाधी आहे. ते गजानन महाराजांचे समकालीन होते. श्री संत झिंग्राजी महाराज व गजानन महाराज हे गुरुबंधू होते.
गांधीजींचे पत्र मंदिराच्या आवारात संग्रहीत
मुऱ्हा देवीच्या वर्षभराच्या दैनिक स्नान, वस्त्रपरिधानासह पूजेचा मान/अधिकार महिलांनाच असल्याने खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा जागरच म्हणता येईल. देवीस आंघोळ घालताना पुरुष तर सोडाच लहान मुलासही गाभाऱ्यात प्रवेश निषिद्ध आहे. पाच वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाच्यावतीने देवीच्या मूर्तीस वज्रलेपही अमरावती निवासी नीलिमा वानखडे यानी लावला होता.
मंदिरांमध्ये हरिजनांना प्रवेशाची चळवळ राबवली असता म. गांधींची संपूर्ण संस्थानांना पत्रे गेली. मुऱ्हा देवी संस्थानला पत्र प्राप्त होताच संस्थानच्या विश्वस्तांनी देशात पहिल्यांदा मंदिर खुले केले. गांधीजींचे पत्र मंदिराच्या आवारात संग्रहीत करण्यात आले आहे.