धामणगाव रेल्वे : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शहरातून निघणारी शेगाव वारी यावर्षी २९ डिसेंबर रोजी प्रारंभ होत आहे. १८१ किलोमीटरचा प्रवास भाविक पाच दिवसांत पूर्ण करणार आहेत.
धामणगाव शहरातील शास्त्री चौकातील ऑटो युनियनमधील युवक अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. सांसारिक जीवनाला अध्यात्मिक जोड असावी म्हणून सहा वर्षांपासून संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी नववर्षानिमित्त ते पैदल वारी करतात. यात तालुक्यातील महिला व पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. शनिवारी कोठारीनगर येथून सकाळी सात वाजता ही वारी निघणार असल्याची माहिती ऑटो युनियनचे अध्यक्ष तथा वारीप्रमुख राजू देवतळे व सीमा देवतळे यांनी दिली. धामणगाव रेल्वे ते शेगाव या पाच दिवसांच्या वारीत शेकडो गजाननभक्त सहभागी होतात. या मानाच्या पालखीचे अनेक ठिकाणी पूजन केले जाते. काही मोजक्या गावात रिंगणाचा फेरसुद्धा धरला जातो.
---------