वलगाव- दर्यापूर रस्त्यालगत, तसेच आसेगाव फाटा येथे पालकमंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. मानवी जीवनात प्राणवायूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोरोना संकटकाळाने तर याची प्रखर जाणीव करून दिली. वृक्ष हे प्राणवायू उत्सर्जित करणारे कायम महत्वाचा स्त्रोत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याची जोपासना केली पाहिजे. वृक्षारोपण ही लोकचळवळ होण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
शेताच्या धुऱ्यावर, सार्वजनिक स्थळी, बगिचे, शाळा, कार्यालय परिसरात, घरातील आवारात वृक्षारोपण करावे. वड, कडुनिंब, पिंपळ, जांभूळ यासारख्या बहुगुणी व दीर्घ आयुष्यमान असणाऱ्या वृक्षांची लागवड करावी. वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.