अमरावती : जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना २०१६-१७ चा विभागीय पुरस्कार जाहीर झाला आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने या पुरस्काराची घोषणा केली.जलयुक्त शिवार हे राज्य शासनाचे अतिशय महत्त्वाकांक्षी अभियान आहे. या योजनेच्या अंमलबाजावणीवर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी हे अभियानाला अतिशय महत्त्व दिले जात आहे. जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके डार्क झोनमध्ये आले होते. या भागात संत्रा पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केल्यामुळे या तालुक्यात भूजल पातळी खालावली होती. त्यामुळे संत्रा बागा संकटात होत्या. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मागील वर्षी वरुड आणि मोर्शी तालुक्यावर लक्ष केंद्रित करून जलयुक्त शिवार अभियानात सर्व यंत्रणेला कामाला लावले. पाणी फाऊंडेशन मध्ये लोकसहभागातून काम करण्यास गावकऱ्यांना प्रोत्साहित केले. जलयुक्त शिवारमधील कामांमुळे या तालुक्यातील भूजल पातळी वाढली आहे. दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी या खारपाणपट्ट्यातही जलयुक्त शिवारची कामे केल्याचे श्रेय जिल्हाधिकाऱ्यांना जाते. त्यामुळे उत्कृष्ट काम केल्याबद्दल विभागीय स्तरावरचा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना जलयुक्त शिवार पुरस्कार
By admin | Published: April 17, 2017 12:17 AM