अमरावती : मंत्रालयास घेरावासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या ३०० वर प्रकल्पग्रस्तांना मंगळवारी सकाळी ११ वाजता मनपा आयुक्त बंगल्यासमोर पोलिसांनी रोखले. त्यामुळे त्यांनी तिथेच ठिय्या दिला. आरडीसी यांच्यासोबत चर्चेदरम्यान १५ दिवसात मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीचे आश्वासन देण्यात आल्याने तूर्त ‘मिशन मुंबई’ स्थगित करण्यात आले. या दरम्यान शासन-प्रशासनाने धोका केल्यास २६ जानेवारीला अप्पर वर्धा प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
प्रलंबित विविध मागण्यांसाठी अप्पर वर्धा धरणग्रस्त पुनर्वसन कृती समिती, मोर्शीद्वारा तेथील तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेष आंदोलनाचा २३६ वा दिवस आहे. मुंबईला जाणाऱ्या ३०० प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी रात्री जिल्हा कचेरीत ठिय्या दिल्यानंतर रात्रीच १२ चे दरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मोर्शी मार्गावरील एका सभागृहात नेण्यात आले. मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा कचेरीवर धडकण्यासाठी सर्व आंदोलक निघाले असताना पोलिसांनी रस्त्यातच अडविले व त्याच ठिकाणी त्यांनी ठिय्या दिला. दरम्यान आरडीसी डॉ. विवेक घोडके यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाद्वारा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आल्याची माहिती कृती समिती सदस्य उमेश शहाणे, अमोल महल्ले यांनी सांगितली.