बाऱ्याची रेलचेल, परीक्षित बाबांचा उत्सव
फोटो - जळगाव १२ पी
मोहन राऊत
दिनविशेष - नागपंचमी
धामणगाव रेल्वे : प्रत्येकाला दोन दिवस उपवास, तव्याचा वापर वर्ज्य, केवळ फुटाण्याचा वापर करीत बाऱ्याची रेलचेल असा प्रकार नजीकच्या जळगाव आर्वी या गावात नागपंचमीच्या दिवशी दिसून येतो. अनेक वर्षांपासून येथे ही परंपरा जोपासली जात आहे.
जळगाव आर्वी हे गाव परीक्षित बाबांच्या नावाने विदर्भात ओळखले जाते. नागपंचमीच्या पाच दिवस आधीपासून शिवारातील कामे बंद असतात. शिवाजी महाराजांच्या दूतावासाचे गाव म्हणून परिचित आहे. त्याकाळी मोगलांनी गावावर वारंवार हल्ले करून हे वसलेले गाव अनेकदा उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर हे गाव काही अंतरावर वसविण्यात आले. परीक्षित राजाने मुनीच्या श्रापापासून मुक्तीसाठी ११ दिवस या मंदिरात नागराजाची पूजा अर्चा केली होती. त्यामुळे त्यांना जीवनदान मिळाले, अशी आख्यायिका आहे.
सन १८०० च्या पूर्वी परीक्षित बाबांच्या मंदिरांची स्थापना तत्कालीन बडे प्रस्थ तथा पोलीस पाटील परसराम भोगे, शेषराव भोगे, दिगंबर भोगे यांनी केल्याची इतिहासात नोंद आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून येथे मोठे मंदिर बांधले आहे. नागपंचमीच्या कालावधीत ग्रामस्थ तीन दिवस परीक्षित बाबांची आराधना करतात. या मंदिरात नागपंचमीचे गीत युवक गातात. शुक्रवारी जिल्ह्यातील भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतील. संपूर्ण वर्षभर शेतीचे व गावाचे रक्षण परीक्षित बाबा करीत असल्याचा विश्वास येथील ग्रामस्थांचा आहे.