अमरावती : जिल्हा परिषदेकडून सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या योजनेच्या कामासाठी पहिल्या टप्यात पाणी पुरवठा विभागाला २७ कोटी ४० लाखाचा निधी गत मार्च एप्रिलमध्ये मिळाला.सदर निधी खर्च झाल्यानंतर मात्र दुसऱ्या टप्यात ४० कोटीच्या निधी पैकी आजघडीला छदामही मिळालेला नाही. दरम्यान जलजीवनची कामे करणाऱ्या ठेकेदारांना महिनाभरा पासून देयके मिळाली नसल्याने कामे ठप्प आहेत.
जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्टही निश्चित केले आहे. जिल्हयातील ६६१ गावांसाठी ६६१जलजीवन योजना मंजूर आहेत. या योजनांपैकी २२९ कामे पूर्ण झाली आहेत. तर ४३२ योजना अद्यापही अपूर्ण आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के हिस्सा दिला जातो. त्यानुसार आतापर्यत जलजीवन मिशनला शासनाकडून पहिल्या टप्यात २७ कोटी ४० लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीमधून २२९ कामे पूर्ण झालेली आहे. २७ कोटी ४२ लाख रूपयाचा खर्च झालेला आहे.
प्रत्येकी तीन महिन्या टप्यात जलजीवन मिशनसाठी शासनाकडून निधी दिला जातो. परंतु एप्रिल महित्यात दिलेल्या २७ कोटी ४० लाखाच्या निधीचा अपवाद सोडला तर आता उर्वरित डिसेंबर अखेरपर्यतच्या कामासाठी सुमारे ४० कोटी रूपयाच्या निधी मागणीचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे सादर केला आहे. मात्र यापैकी एक रूपयाचाही निधी अद्यापपर्यत मिळालेला नाही. त्यामुळे जलजीवन मिशनची जिल्हाभराती कामे विस्कळीत झालेली आहे.
११ कोटीचे देयके पडून
जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात कंत्राटदरांनी पाणी पुरवठयाची विविध कामे केलेली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर देयकांचे प्रस्तावही सादर केलेले आहेत. मात्र जलजीवन मिशन योजनेसाठी सध्या निधी उलब्ध झाला नसल्याने ११ कोटीची देयके पडून आहेत. त्यामुळे कंत्राटदारही त्रस्त झाले आहेत. कामे केल्यानंतरही देयके वेळेवर मिळालेले नाही. त्यामुळे पुढचे काम करण्यासाठी ठेकेदारांकडे निधी नाही, यामुळे कामे मुदतीत पूर्ण होणे शक्य नसल्याचे कंत्राटदरांचे म्हणणे आहे.