अमरावती : केंद्र सरकारची ‘हर घर जल’ ही महत्त्वाकांक्षी योजना येत्या मार्च महिन्या अखेर पर्यत १०० टक्के कामे पूर्ण करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागासमोर उभे ठाकले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ६६६ योजनांपैकी आतापर्यत ३२९ योजना पूर्ण झाल्या आहेत. तर ३३७ कामे प्रगतिपथावर आहेत; मात्र ही कामे येत्या मार्चअखेरपर्यत पूर्ण होणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मार्च २०२४ पर्यत सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उपलब्ध माहितीनुसार फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३२९ योजना पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ३३७ योजनांपैकी आजघडीला २८१ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे नळजोडणीत जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ जलजीवन मिशन ६६६ पाणीपुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. जिल्ह्यात जलजीवन मिशनमध्ये नळजोडणी कामे जवळपास पूर्ण केली आहे. मात्र योजनांच्या कामाबाबत संथगती सुरू आहे.
जलजीवन मिशन म्हणजे काय?‘हर घर जल’ या संकल्पनेसह केंद्र सरकारने सन २०२४ पर्यत ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे पाणी आणि सुरक्षित पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन (जेजेएम) सुरू केले आहे. या योजनेमधून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे.
जलजीवन मिशनच्या कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कामाच्या बाबतीत अव्वल आहे. जलजीवन मिशनची कामे ३१ मार्चपर्यत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले आहे. शंभर टक्के कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा पाणी पुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अमरावती