येवदा (अमरावती) : स्थानिक बस स्टॅन्डवर निमकार यांच्या चहा टपरीचा आमदार विजय वडेट्टीवार यांनी ताबा घेतला. स्वतःच्या हाताने चहा बनवले आणि त्या चहाचा आस्वाद स्वतःसह कार्यकर्त्यांनासुद्धा दिला. निमित्त होते दर्यापूर मतदारसंघातील जनसंवाद यात्रेचे. विरोधी पक्षनेत्याच्या या अनोख्या तऱ्हेचे लोकांनी स्वागत केले. चहा टपरीवर त्यांना बघण्याकरिता लोकांची झुंबड उडाली होती.
दर्यापूर मतदारसंघातील जनसंवाद यात्रेला वडनेर गंगाई येथून सुरुवात करण्यात आली. यामध्ये विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, सुधाकर भारसाकडे, बाळासाहेब हिंगणीकर गावंडे प्रामुख्याने सहभागी झाले. नेत्यांचे वडनेर गंगाई गावात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी व क्रेनच्या साह्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला. बैलबंडीमध्ये बसवून त्यांची रॅली काढण्यात आली. वडनेर गंगाई येथील काँग्रेसचे कार्यकर्ते व हजारो नागरिक या जनसंवाद यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
नागरिकांनी यावेळी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांनीदेखील शेतीचे नुकसान, भरपाई, आरक्षण, शैक्षणिक सुविधा याबाबत आपली मते मांडली. जनसंवाद यात्रेचे येवदा येथे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात सर्वांचे स्वागत करण्यात आले. जनसंवाद रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.