अमरावती : व्यसनाला नाही म्हणायला शिका. नाहीतर व्यसन मग जगातल्या सर्व वाईट मार्गांचा अवलंब करायला आपल्याला शिकवते. त्यासाठी आजच शपथ घ्या, अंमली पदार्थाला नाही म्हणा… से नो टू ड्रग्स, अशी शपथ घ्या, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने व्यापक जनजागृतीकरीता २६ जून रोजी शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्या मालिकेत सोमवारी सकाळी ७.३० वाजता इर्विन चौक येथून पोलीस अधिकारी, अंमलदार आणि | सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून सायकल रॅली तसेच मोटर सायकल रॅली काढली. जयस्तंभ चौक मार्गे राजकमल चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या माध्यमातून शहरातील तरुण, विद्यार्थी व नागरिकांना तंबाखू, सिगारेट, दारू, आणि ड्रग्ज यासारख्या घातक व्यसनांपासुन दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. रॅलीमध्ये ६० ते ७० पोलीस अधिकारी, अंमलदार आणि नागरिकांनी सहभाग घेतला.
पोलीस आयुक्तन नविनचंद्र रेड्डी, उपायुक्तद्वय सागर पाटील व विक्रम साळी, सहायक आयुक्तत्रयी प्रशांत राजे, पुनम पाटील व भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ते जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
ठाणे स्तरावरही जनजागृती
शहर आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाळा, |महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सोबतच, सोमवारी सायंकाळी पथनाट्य देखील सादर करण्यात आले. कोणत्याच दबावाखाली किंवा आपण एकटे पडण्याच्या भीतीने ड्रग्सला होकार देऊ नका. एकदा का तुम्ही होकार दिला मग शरीराला सवय होते. त्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही, असे अनेक दाखले देत हा जनजागर केला जात आहे.