विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : हजारो भाविकांची मांदियाळीअमरावती : स्थानिक माताखिडकी येथील पुरातन श्रीकृष्ण मंदिरात २४ आॅगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आली आहेत.राजस्थानी शैलीत धौरपुरी पिंक दगडात श्रीकृष्ण मंदिराची भली मोठी वास्तू बांधण्यात आली आहे. महाराष्ट्रास दिल्ली, पंजाब, राजस्थान येथून भाविकांची दर्शनासाठी रीघ लागत आहे. भागवतात असलेल्या कथेनुसार कौंडण्यपूर माहेर असलेल्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी निश्चित झाला होता. परंतु रुक्मिणीला त्यांचेशी विवाह करावयाचा नव्हता. तिने मनोमन श्रीकृष्णाशी विवाह करण्याचे ठरविले होते. तिकडे श्रीकृष्णानेदेखील रुक्मिणीचे निस्सीम प्रेमामुळे तिचेशीच विवाह करण्याचा निश्चय केला होता.रुक्मिणीने आपला विचार एका पत्रात लिहून सुदेव नामक ब्राम्हणाच्या हस्ते श्रीकृष्णास प्रार्थनापूर्वक कळविला. शिशुपालाशी ठरलेल्या विवाहाचे एक दिवस कुळाचे रितीरिवाजानुसार नियोजित वधू म्हणून जेव्हा मी अंबादेवीचे दर्शनास जाईल तेव्हा आपण मला घेऊन जावे, असा प्रस्ताव रुक्मिणीने त्या पत्रात ठेवला होता. माताखिडकी (बुधवारा) येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण महाराजांचा तीन दिवस मुक्काम होता. याच मंदिरात श्रीकृष्ण महाराज रुक्मिणीचे चिंतन करीत होते. ठरल्यानुसार रुक्मिणी अंबादेवीचे दर्शनास आली तेव्हा तेथून तिचे श्रीकृष्णांनी हरण केले, अशी आख्यायिका आहे.श्रीकृष्ण महाराजांचा त्यावेळी याच ठिकाणी मुक्काम झाल्यामुळे हे मंदिर श्रीकृष्ण चरणांकित आहे. नेहमीच भाविकांची येथे गर्दी असते. जन्माष्टमीला जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. जन्माष्टमीच्या दिवशी महोत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीकृष्ण मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुभाष पावडे, सदस्य अशोक राऊत, अरुण ठाकरे, सुशांत चर्जन, रावसाहेब राऊत, एस.पी. देशमुख, व्यवस्थापक मंडळ विनोद कराळे, नितीन देशमुख, राहुल सावरकर यांनी केले आहे.(प्रतिनिधी)
श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमी उत्सव
By admin | Published: August 24, 2016 12:08 AM