अमरावती : दिराणी (धाकटी जाऊ) ला जाळून मारणाऱ्या जाऊला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ एस. एस. अडकर यांनी ९ सप्टेंबर रोजी हा निर्णय दिला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कंझरा येथे १० जानेवारी २०१५ रोजी ही घटना घडली होती. मंगला किशोर अंभोरे (३३, वाॅर्ड क्रमांक ३, कंझरा) असे शिक्षाप्राप्त महिलेचे नाव आहे.
संध्या सुुधाकर अंभोरे (रा. कंझरा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेबाबत मृताच्या पित्याने १२ जानेवारी २०१५ रोजी तक्रार दाखल केली होती. संध्या अंभोरे यांचा १७ जानेवारी २०१५ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आरोपी मंगला अंभोरे हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ४ एप्रिल २०१५ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास नांदगाव खंडेश्वर ठाण्यातील तत्कालीन एपीआय शुभांगी आगाशे यांनी केला.
याप्रकरणी सहायक सरकारी वकील दीपक आंबलकर यांनी पाच साक्षीदार तपासले. यात मृताचा पती व सासू फितूर झाले. आरोपी मंगला अंभोरेविरूद्धचा खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. अडकर यांनी तिला आजन्म कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली.
/////////////
अशी घडली घटना
संध्या ही पती, सासू, सासरे, जाऊ व भासऱ्यासोबत एकत्र राहायचे. परंतु काही दिवसात धाकट्या व थोरल्या जाऊंमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे आरोपी मंगला ही तिच्या पतीला घेऊन एकाच घरात मात्र वेेगळी राहू लागली. मात्र हॉल व बाथरूम एकत्र होते. घटनेच्या दिवशी १० जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास संध्या ही कपडे धूत असताना मंगला तेथे आली. शिवीगाळ झाली. हा वाद सोडवून सासू घराबाहेर निघून गेली. त्यानंतर काही वेळाने संध्या ही हॉलमध्ये असताना मंगलाने तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. ती घराबाहेर पळत सुटली. तिला पतीने दवाखान्यात दाखल केले होते.