शासनाचा निषेध : अबकारी कर रद्द करण्याची मागणीअमरावती : केंद्र शासनाने सुवर्णकार व्यवसायावर लावलेला अबकारी कर रद्द करण्यासाठी गुरुवारी अमरावतीत सराफा व्यवसायिकांनी जेलभरो आंदोलन पुकारले. या आंदोलनात शेकडो सराफा व्यवसायिकांनी अटक करून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. स्थानिक राजकमल चौकात सराफा व्यापारी असोसिएशन, सुवर्णकार संघ, गलाईवाले असोशिएशन आदी संघटनांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली. जेलभरो आंदोलनाला प्रारंभ करण्यापूर्वी सुवर्णकार व्यवसायिकांनी स्थानिक सराफा बाजार ते राजकमल चौकादरम्यान मोर्चा काढला. यावेळी शासन धोरणाविरोधात गगनभेदी नारेबाजी देत नागरिकांचे लक्ष वेधले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून हजारो सुवर्णकार गुरुवारी दुपारी १२.१५ दरम्यान राजकमल चौकात एकत्रित आले होते. या आंदोलनामुळे राजकमल चौकातील वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दखल घेत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. जेलभरो आंदोलनात नवरतनमल गांधी, अविनाश चूटके, अनिल चिमोटे, राजेंद्र भंसाली, मुकेश श्रॉफ, अजय तिनखेडे, राहुल पाटील यांच्यासह शेकडो सुवर्णकारांनी अटक करून घेतली.
सराफा व्यवसायिकांचे जेलभरो
By admin | Published: April 01, 2016 12:28 AM