अमरावती: प्रकल्पग्रस्ताचे खोटे प्रमाणपत्र जोडून राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपायाची नोकरी मिळविणाऱ्याचे बिंग अखेर चार वर्षानंतर फुटले. याप्रकरणी, फ्रेजरपुरा पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी आरोपी पोलीस शिपाई मनोज राऊत (२८, रा. नवेगाव, जि. गडचिरोली) याच्याविरूध्द फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. राज्य राखीव दल गट क्रमांक १८ काटोल येथील पोलीस निरिक्षक किशोर चौधरी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली.
राज्य राखीव दल गट क्रमांक १८ हे बटालियन नवनिर्मित असून, ते अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ ला संलग्न आहे. आरोपी शिपाई मनोज राऊत हा नवेेगाव गडचिरोली, ह.मु. कॅम्प येथे नेमणुकीस आहे. पो स्टे गडचिरोली येथे आरोपीवर खोटे प्रकल्पगस्त प्रमाणपत्र बनवून घेऊन पोलीस विभागाला सादर केल्याचे व आरक्षणाचा लाभ घेतल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र पोलिसांनी चौकशी केली असता त्याचा सहभाग निष्पन्न झाला नाही. म्हणून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली नाही. परंतु प्रकल्पगस्त प्रमाणपत्राचा आधार घेऊन सन २०१९ मध्ये झालेल्या राज्य राखीव पोलीस भरतीमध्ये समांतर आरक्षण घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रमाणपत्रावर दिसली खाडाखोडपोलीस निरिक्षक किशोर चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बिड येथे जाऊन आरोपी मनोज राऊत याच्या प्रकल्पगस्त प्रमाणपत्राची शहानिशा केली. त्यावर खोडाखाड दिसून आली. त्याच्यावर नरहरी सर्जेराव खडागडे हे अस्पष्ट खोडलेले दिसून आले. त्यावरून आरोपीने पोली सेवा प्रवेश करतांना भरतीमध्ये बनावट प्रकल्पगस्त प्रमाणपत्राचा आधार घेऊन आरक्षण घेतल्याचे निष्पन्न झाल्याचे निरिक्षण चौधरी यांनी नोंदविले. त्यानुसार, राऊत हा अमरावतीला कार्यरत असल्याने त्याच्याविरूध्द येथे गुन्हा दाखल करण्यात आला.