चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यरत एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने शासकीय वरिष्ठ अधिकारी कर्मचारी असलेल्या मग्रारोहयोच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या अश्लील चित्रफितीसंदर्भात लोकमतने प्रकाशित केलेले वृत्त मेळघाट ते मुंबईपर्यंत मंगळवारी दिवसभर चर्चेत राहिले.
चिखलदरा तालुक्यातील मग्रारोहयोचा एक महसूल, वनविभाग, व्याघ्र प्रकल्प अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश असलेला व्हाॅट्सॲप ग्रुप आहे. त्यावर एका निर्लज्ज वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने अश्लील चित्रफीत टाकून आपल्या अकलेचे तारे तोडले होते. काही वेळानंतर ती क्लिप डिलीट करण्यात आली. मात्र, तोपर्यंत त्याचे पुरावे स्क्रीनशॉटच्या माध्यमातून अनेकांनी काढले आणि लोकमतला पाठविले होते.
बॉक्स
मेळघाट ते मुंबई अनेक ग्रुपवर लोकमतचे वृत्त
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा हा प्रताप मंगळवारी लोकमतने प्रकाशित करताच सकाळपासूनच अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यत: वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर प्रकाशित वृत्त फिरत होते. काहींनी व्हाॅट्सॲप ग्रुप अधिकृत नसतो, अशा प्रतिक्रिया टाकल्याची खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. मात्र, या कृत्याचे समर्थन कोणीच केले नाही. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला साडेसाती लागली आहे. अनेक गंभीर महिलाविषयक प्रकरणे बाहेर येत असताना आणि काही चापलूस अधिकाऱ्यांना बदनामीची भीती सतावत असताना प्रत्यक्षात ती होऊ नये, यासाठी करावयाचे कार्य मात्र शून्य आहे.