अमरावती : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी ४ जुलै डेडलाइन आहे. यामध्ये राणा व वानखडे यांच्या प्रतिनिधीद्वारा शॅडो रजिस्टरमधील खर्च नोंदीबाबत काही मुद्दे उपस्थित केले, दरम्यान, ऑब्झर्व्हर अनुपकुमार वर्मा यांनी आढावा घेत पथकाला सूचना केल्या. सध्या पथकाद्वारा खर्चाच्या नोंदीची पडताळणी करण्यात येत आहे.
मतमोजणी झाल्यानंतर उमेदवारांना खर्च सादर करण्यास ४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या अवधीत जवळपास ३५ उमेदवारांनी निवडणूक खर्च पथकाकडे सादर केला आहे. यामध्ये काही त्रुटी असल्यास ४ जुलैपर्यंत उमेदवारांना ती दुरुस्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मतमोजणीपासून ३० दिवसांन्या आत निवडणूक खर्चाची पूर्तता करणे उमेदवारास बंधनकारक आहे. त्याच अनुषंगाने ऑब्झर्व्हर यांनी सोमवारी बैठक घेत उमेदवारी खर्चाची पडताळणी केली.
दोन दिवस पुन्हा खर्चाचा ताळमेळ होणार आहे व त्यानंतर उमेदवारांचा खर्च भारत निवडणूक आयोगास सादर होईल. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने २५ लाखांनी उमेदवारी खर्चाची मर्यादा वाढवून ९५ लाख केली. त्यामुळे उमेदवारांनी खर्चासाठी हात मोकळा केला, पण खर्च सादर करण्यासाठी हात आखडता घेतला. उमेदवाराच्या विजयी रॅलीपर्यंतचा खर्च या निवडणूक खर्चात समाविष्ट राहणार आहे.
शॅडो रजिस्टरपेक्षा बूब यांचा खर्चपथकांद्वारा उमेदवारांच्या प्रत्येक खर्चाची नोंद विहीत दरपत्रकानुसार शॅडो रजिस्टरमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. माहितीनुसार प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांचा शॅडो रजिस्टरनुसार निवडणूक खर्च ९० लाख रुपयांचा नमूद करण्यात आलेला आहे. त्या तुलनेत त्यांच्याद्वारा ९१ लाख खर्च दाखविण्यात आलेला आहे.
वानखडे, राणा यांच्या खर्चाची पुन्हा पडताळणीमहाविकास आघाडीचे विजयी उमेदवार बळवंत वानखडे व महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याद्वारा ५० ते ६० लाखांपर्यंत निवडणूक खर्च दाखविण्यात आला. त्यातुलनेत शॅडो रजिस्टरमध्ये निवडणूक खर्चाची नोंद जास्त आहे. बैठकीत त्यांच्या प्रतिनिधींद्वारा दरपत्रकावरच काही आक्षेप घेतले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीमध्ये चर्चा होऊन पथकाद्वारा खर्च अंतिम करण्यात येणार आहे.
उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवडणूक खर्च निरीक्षकांसमोर शॅडो रजिस्टरमधील दराबाबत काही आक्षेप नोंदविले. त्यानुसार पथकाद्वारा त्या नोंदी तपासून खर्च अंतिम करण्यात येईल.- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी