अमरावती : शेतमाल बाजारात पोहोचविण्यासाठी तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत नेण्यासाठी बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री पांदण रस्त्यांच्या कामाला गती देऊन मंजूर पांदण रस्ते १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री ना. संदीपान भूमरे यांनी मंगळवारी यंत्रणेला दिले.
मग्रारोहयोंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पांदण रस्ता योजना अंमलबजावणीबाबत अमरावती विभागाची आढावा बैठक ना. भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, नरेगा आयुक्त शांतनु गोयल व विभागातील पाचही जिल्हाधिकारी उपस्थित होते.
दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब आहे. पांदण रस्ते हे प्रामुख्याने शेती कामासाठी आवश्यक साधनांची ने-आण करण्यासाठी उपयोगात येतात. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावी, रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध करून द्यावे, ज्या गावात रोहयोच्या कामांवर मजुरांचा प्रतिसाद चांगला आहे, तेथे आवश्यक कामे हाती घ्यावीत. जेणेकरून मजुरांना रोजगार मिळेल व रोजगारामुळे मजुरांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, असे निर्देश ना. भूमरे यांनी दिले.
प्रत्येक पंचायत समितीत मातोश्री भवन
प्रत्येक पंचायत समितीत रोजगार सेवकाला कामकाजासाठी तसेच आसन व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी मातोश्री भवन स्थापन करण्यात येईल. राज्यात एक लाखावर रस्त्यांची मागणी आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे करण्यावर भर द्या. याशिवाय शाळेची कुंपण भिंत, स्मशानभूमी अशा कामांसाठीही रोहयोच्या मजुरांची मदत घेण्याची सूचना ना. भूमरे यांनी केली.