लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिव्यांग, अनाथ, विधवा, परितक्त्या, शेतकरी, शेतमजूर व बेघरांच्या न्याय, हक्कासाठी प्रहार संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरु झाले आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या प्रारंभीच आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या आंदोलनाने प्रशासन हैराण झाले आहे. तर दुसरीकडे आंदोलनस्थळाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.स्थानिक गाडगेनगरस्थित संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील प्रागंणात राहुट्या टाकून न्याय, हक्कासाठी एकवटले आहेत. स्वातंत्र्यांच्या ६० वर्षांनंतरही कापडी पालाच्याघरात राहावे लागत असल्याचे भीषण वास्तव आ. कडू यांच्या नेतृत्वात मांडण्यात आले आहे. बेमुदत अन्नत्याग आंदोलनासाठी बाहेरगावाहून हजारो नागरीक एकवटले आहेत. यात अनाथ, विधवा, बेघर, अपंग, शेतकरी, शेतमजूरासह बेरोजगार युवकांचा समावेश आहे. शासन, प्रशासन जेथपर्यत प्रश्न सोडवित नाही, तेथपर्यत हे अन्नत्याग आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका आ. कडू यांनी घेतली आहे. सीमेवर शत्रुशी झुंज देताना वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना अनुकंपा धोरण लागू झाले नसल्याबाबत शल्य व्यक्त करण्यात आले आहे. दिव्यांगाचे समस्या, प्रश्न आंदोलनात अग्रस्थानी आहे. अन्नत्याग आंदोलनाला आ. बच्चू कडू यांच्यासह छोटू महाराज वसू, प्रमोद कुदळे, अमोल कावलकर, मुकेश घुंडीयाल, सौरभ इंगळे, बबलू जवंजाळ, गोलू ठाकूर, प्रदीप वडकर, चंदू खेङकर आदी सहभाग झाले आहेत.
प्रहारचे अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:15 AM
दिव्यांग, अनाथ, विधवा, परितक्त्या, शेतकरी, शेतमजूर व बेघरांच्या न्याय, हक्कासाठी प्रहार संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरु झाले आहे.
ठळक मुद्देबच्चू कडुंचे नेतृत्व : दिव्यांग, अनाथ, विधवा, बेघरांच्या हक्कासाठी लढा