मोहन राऊतअमरावती: समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची दिवाळीच्या दिवशी पूजन केले जाते. घरोघरी साठवलेली नाणी, नोटा व पुरातन नाण्यांचा संग्रह लक्ष्मीपूजनाच्या आरासात ठेवला जातो. मंगरूळ दस्तगीर येथील दिलीप महात्मे या एका ध्येयवेड्या तरुणाने भारतीय चलनासोबतच १५१ देशांमधील नाणी, १५ राष्ट्रांच्या चलनी नोटांचे पूजन करण्याचा संकल्प केला आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर या गावातील अग्निपंख एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक दिलीप वसंतराव महात्मे व नकुल विश्वनाथ प्रभे यांनी गेल्या दहा वर्षांपासून भारतातील व जगातील ऐतिहासिक नाणी व नोटा यांचे संकलन केले आहे. त्यांनी विविध देशांमधील तीन हजार नाणी व नोटा संकलित केल्या आहेत. याशिवाय जगभरातील १५१ देशांमधील ऐतिहासिक नाणी व नोटा यांचेसुद्धा जतन केले आहे.
सर्वप्रथम १० वर्षांपूर्वी दिलीप महात्मे यांच्याकडे देवघरातील १०, १५ शिक्के होते. त्यानंतर त्यांनी इतर देशांचे चलन जमविण्याचा ध्यास घेतला. त्यांनी त्यांचाच परिचित व्यक्तींकडून ही नाणी व नोटा संकलन केल्या. एकदा परिचय मिळविल्यानंतर मुंबई, पुणे आळंदी, नागपूर, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणांहूनसुद्धा शिक्के भेट मिळत गेले. सर्वात महत्त्वाचे की, या सर्व नाण्यांसाठी त्यांनी एक रुपयाही खर्च केलेला नाही.आजही ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रदर्शन पाहण्यासाठी शहराकडे स्वत:चे पैसे खर्च करून जावे लागते. त्यामुळे चलनी नाणी, नोटांच्या आधारे त्या-त्या देशातील इतिहास विद्यार्थ्यांपुढे विनामूल्य मांडण्याचा व त्यासाठी प्रत्येक शाळा-महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन विनामूल्य आयोजनाचा या द्वयींचा मानस आहे.
जगभरातील चलनांचा साठाऑस्ट्रेलिया, अँगोला, बेल्जियम, बांग्लादेश, बहारिन, चेक गणराज्य, डेन्मार्क यांसह दीडशे देशांमधील चलनाचा हा ऐतिहासिक ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी बघावा आणि अभ्यासावा. या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जुन्या संस्कृतीचा आपल्या पूर्वजांचा तसेच जागतिक पातळीवरील चलन व नोटांचा इत्थंभूत इतिहास अभ्यासता यावा, अशी इच्छा या दोघा संग्रहकर्त्यांची आहे.- दिलीप महात्मे - नकुल प्रभे, मंगरूळ दस्तगीर