अमरावती : येथील अशोक कॉलनी अर्जुननगरस्थित रहिवासी तथा नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी असलेले आयएएस स्वप्नील वानखडे हे हल्ली मध्यप्रदेेशच्या जबलपूर महापालिका आयुक्तपदी कार्यरत आहेत. अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीतच त्यांनी आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवीत ‘कबाड से कमाल’ या यशस्वी प्रयोगाची मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान दखल घेत त्यांची प्रशंसा केली आहे.
जबलपूर महापालिका आयुक्त स्वप्नील वानखडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘कबाड से कमाल’ लोकोपयाेगी उपक्रमाचे लोकार्पण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांच्या हस्ते १० जून रोजी पार पडले. जुन्या भंगार बसपासून तयार करण्यात आलेल्या महिला पोलिस चौकी, स्लम भागासाठी ग्रंथालय, नर्मदा घाटावर महिलांसाठी चेंजिंग रूम, पावसापासून बचाव कक्ष, भांड्यांची बँक, थैली बँक, गरीब प्रवाशांसाठी टुरिस्टचा वापर बघून मुख्यमंत्री चव्हाण अवाक् झाले. जुन्या आणि न वापरायोग्य बसचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करून त्या बस लोकोपयाेगी कार्यासाठी बहाल केल्याबद्दल आयुक्त स्वप्नील वानखडे यांच्या पाठीवर मुख्यमंत्री चौहान यांनी कौतुकाची थाप लगावली. या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या सीईओ जयती सिंह, अपर जिल्हाधिकारी मीसा सिंह, वित्त विभागाचे संचालक विमलेश सिंह, जबलपूर महापालिकेच्या शिक्षणाधिकारी वीणा वर्गीस, कार्यपालन अधिकारी जी. एस. मरावी, जेसीटीएसएलचे सीईओ सचिन विश्वकर्मा आदी उपस्थित होते.
नवोदय विद्यालयात सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण
आयएएस झालेले स्वप्नील वानखडे यांचे शिक्षण येथील नवोदय विद्यालयात सहावी ते बारावीपर्यंत झाले आहे. पुढे अभियांत्रिकेचे शिक्षण बीड येथे झाले. स्वप्नील हे सन २०१६ मध्ये आयएएस झाले. वडील गोपाळराव वानखडे हे हायस्कूलचे मुख्याध्यापक, तर आई आशा वानखडे येथील सुपरस्पेशालिटीमध्ये स्टॉप नर्स होत्या. आता ते दोघेही सेवानिवृत्त झाले आहेत.
जबलपूरला जुन्या बस भंगार म्हणून पडल्या होत्या आणि त्याचा कोणताही उपयोग होत नव्हता. त्यामुळे त्याचा उपयोग करण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग करणे सुरू केले. आता बसमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे.
- स्वप्नील वानखडे, आयुक्त, महापालिका, जबलपूर