पान २ बॉटम
दोन महिन्यांपूर्वी तीन पॉझिटिव्ह, चाचणीशिवाय गावात ‘नो एन्ट्री’
मोहन राऊत/धामणगाव रेल्वे
: तालुक्यातील कामनापूर-घुसळी येथे दोन महिन्यांपूर्वी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले होते. मात्र, येथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी २० दिवसांत गाव कोरोनामुक्त केले. आता भाजी विक्रेता असो वा फेरीवाला, पंधरा दिवसांच्या आतील निगेटिव्ह कोरोना चाचणी अहवाल दाखविल्याशिवाय त्याला गावात प्रवेश नाही. आज गावात एकही रुग्ण नाही.
तालुक्यातील घुसळी-कामनापूर हे दीड हजार लोकवस्तीचे जुळे गाव. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन घुसळीकर यांच्या मार्गदर्शनात येथील ग्रामपंचायतचा कारभार सुरू आहे. पहिल्या लाटेत या गावात ५० वर्षे वयोगटातील तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आरोग्य कर्मचारी मनोज सरदार यांनी झपाट्याने कोरोना चाचण्या घ्यायला सुरुवात केली. प्रशासनाचे गावात दौरे सुरू झाले. गावकऱ्यांनी स्वत:वर निर्बंध लादले. परिणामी वीस दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही आणि संक्रमितदेखील बरे झाले.
गावातील कोरोना समितीने आपापल्या कामात स्वतःला अधिक झोकून दिले आहे. सरपंच राजेंद्र बांते व उपसरपंच सुभाष डबले हे दररोज सकाळी ७ व सायंकाळी ६ वाजता गावात फिरून कुणाला सर्दी, ताप आहे का, कुणी आजारी आहेत का, याची विचारपूस करतात. सचिव मनीष सावळे हे पंधरवड्यात गावात सोडियम हायपोक्लोराईडची नियमित फवारणी करून घेतात. बाहेरगावावरून कोण येत आहे, याकडे पोलीस पाटील मीना कडू लक्ष ठेवून आहेत. ग्रामपंचायत सदस्य शंकर सयाम, दुर्गा लोणकर, जयश्री लसवंते, लता वरखडे, रेखा मोहोड हे प्रभागातील आरोग्याकडे लक्ष देत आहेत. महिन्याकाठी प्रत्येक ग्रामस्थाच्या तपासणीची जबाबदारी अंगणवाडी सेविका निर्म़ला गिधाणे, संगीता थोरात, आशा सेविका सुनीता गिधाने, अश्विनी थोरात सांभाळत आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र मसराम, अशोक चामलाटे हे गावाच्या स्वच्छता व पाणी निर्जंतुकीकडे लक्ष ठेवतात.
-------------
मास्क अनिवार्य
गावातील युवकांनी राजकारण बाजूला ठेवून वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. गावात कोरोना चाचणीशिवाय कोणालाही प्रवेश नाही. ग्रामस्थांना मास्क घालणं बंधनकारक केले असून, दोनशे रुपये दंड आकारण्यात येऊ लागला आहे. ़
----------------
गाव सोडण्याची परवानगी नाही
कोरोना उद्रेकानंतर गावात कोणत्याही समारंभाचे आयोजन करण्यात आलेले नाही. गावातील व्यक्तींना शेजारच्या गावात जाण्याचीदेखील परवानगी देण्यात आलेली नाही. बाहेरील व्यक्ती आढळल्यास पाचशे रुपये दंड ठोठावला जातो. दररोज सकाळ-संध्याकाळी दवंडी देऊन नियम पाळण्याचे आवाहन केले जाते.
--------------
कोट
दोन महिन्यांपूर्वी गावात चार कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, आम्ही वेळीच अंमलबजावणी केली. गावात इतर गावातील ग्रामस्थांना प्रवेश नाही. गावकरी सहकार्य करीत आहेत.
- राजेंद्र बांते, सरपंच
-----------
शासनाने दिलेली त्रिसूत्री प्रत्येक ग्रामस्थ पाडत आहे. त्यामुळे आम्ही गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू दिला नाही. हिवरेबाजारचा आदर्श आम्ही घेत आहोत
- मनीष सावळे, ग्रामसचिव