लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : कांद्रीबाबा (हनुमान) मंदिर परिसरात मनाईनंतरही शनिवारी चूल पेटवूच, असा इशारा आदिवासी तारुबांदा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला आहे. त्यामुळे आदिवासी विरुद्ध वनविभाग असा संघर्ष पुन्हा पेटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गुगामल वन्यजीव विभागांतर्गत तारूबांदा वनपरिक्षेत्रात गावापासून दोन किमी अंतरावर कांद्रीबाबा मंदिर हे आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. वनविभागाच्या अखत्यारीत असल्याने येथे आदिवासींना प्रवेशाला बंदी होती.परिसरातील ग्रामवासीयांच्या भावना लक्षात घेऊन तारुबांदा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मंदिरावर जाण्याची बंदी उठवली. परंतु, परिसराला धोका असल्याने चूल पेटवू नका, असे सूचविले. आदिवासी बांधवांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा प्रस्ताव धुडकावून लावत ८ जूनला मंदिर परिसरात महाप्रसादाकरिता चूल पेटविणार असल्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी लेखी पत्रातून दिला होता.वनविभाग व आदिवासी बांधव यांच्यात संघर्ष उसळून अनुचित प्रकार घडू नये, याकरिता धारणीचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, कॉन्स्टेबल अनिल झारेकर, नंदू पाटमासे हे मध्यस्थी करीत आहेत. या दृष्टीने वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. मोरे, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुंदर कासदेकर आणि तारुबांदा, पाटकहू, भिरोजा, केशरपूर येथील नागरिक यांच्या उपस्थितीत तारूबांदा येथे या मुद्द्यावर समेटासाठी गुरुवारी रात्री ८ वाजता बैठक बोलावण्यात आली होती.कांद्रीबाबा मंदिर हे कोअर क्षेत्रात नसून, बफर क्षेत्रात आहे. त्यामुळे त्यावर गावकºयांचा अधिकार आहे. तेथे आदिवासी पूजाअर्चा करतात व महाप्रसाद करण्यासाठी चूल पेटवितात. वनविभागाने आमच्या भावनांशी न खेळता पूर्वापार परंपरा पाळाव्यात, अशा भावना रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीला उपस्थित आदिवासींनी व्यक्त केल्या. मंदिर परिसरात शनिवारी आदिवासी बांधव चूल पेटवून स्वयंपाक करणार आहेत. त्यामधे वनविभागाने अडथळा केल्यास परिणामांची जबाबदारी स्वीकारावी, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला.दरम्यान, आदिवासींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तूर्तास सावध पवित्रा घेतला आहे. आदिवासींसोबत गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीदरम्यान उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारीदेखील काहीही बोलले नाहीत. पोलीस प्रशासनालाही वनविभागाच्यावतीने काहीही निर्देश नसल्याची माहिती आहे.पंधरवड्यापासून आदिवासींमध्ये धुमसत असलेल्या रोषासंदर्भात आदिवासी बांधवांनी लेखी निवेदन दिले व आंदोलनाची पत्रके काढली. तरीसुद्धा जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व वनविभागातील अधिकाºयांनी दखल घेतली नाही वा गावात येऊन आदिवासी बांधवांशी चर्चा केली नाही. यामुळे आदिवासी बांधवांची अधिकाºयांना काळजी नसल्याचा सूर सर्वत्र उमटत आहे.का दुखावल्या भावना?कांद्रीबाबा मंदिर परिसरात १८ मे रोजी एका आदिवासी बांधवाकडील पूजा आटोपल्यानंतर स्वयंपाकाच्या बेताने दुपारी 12 वाजता चूल पेटविण्यात आली. तेथे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवंसरक्षक शिवकुमार व त्यांचे कर्मचारी पोहचले. त्यानी अन्न शिजत असलेल्या चुलीतील जळती लाकडे पाणी टाकून विझविली. आदिवासी बांधवाना तेथून हाकलून लावले.आदिवासी बांधव शनिवारी मंदिर परिसरात पूजाअर्चा करून महाप्रसादाकरिता चूल पेटवतील. वनविभागाने बाधा आणल्यास होणाºया परिणामांना ते जबाबदार राहतील.- सुंदर कासदेकर, अध्यक्षवनव्यवस्थापन समितीआदिवासी बांधव व वनविभागाचा वारंवार समन्वय घडवून आणला. त्यात त्यांचे समाधान झाले नसल्याने शनिवारी आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यांना शांततेत आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- विलास कुलकर्णीपोलीस निरीक्षक, धारणी
कांद्रीबाबा मंदिर परिसरात चूल तर पेटणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 1:33 AM
कांद्रीबाबा (हनुमान) मंदिर परिसरात मनाईनंतरही शनिवारी चूल पेटवूच, असा इशारा आदिवासी तारुबांदा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला आहे. त्यामुळे आदिवासी विरुद्ध वनविभाग असा संघर्ष पुन्हा पेटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्देआज तारूबांद्यात आंदोलन : समस्त आदिवासी बांधवांचा वनविभागाला इशारा