अमरावती : सोलापूर येथील अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोशल सायन्स येथे नुकत्याच पार पाडलेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ४३ व्या वार्षिक अधिवेशनात स्थानिक कौटिल्य ज्ञानप्रबोधिनीच्या तीन सभासदांनी पारितोषिके पटकाविली. यात वनिता चोरे, प्रशांत हरमकर व राजश्री रायभोग यांचा समावेश आहे.स्थानिक कॅम्प परिसरात कौटिल्य ज्ञानप्रबोधिनीचे केंद्र आहे.
चांदूर बाजार येथील नारायणराव अमृतराव देशमुख महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक वनिता चोरे यांच्या ‘फळ उत्पादनाचे अर्थशास्त्र’ या ग्रंथाला ११ हजार रुपये आणि श्रीमती बयोबाई कदम ग्रंथ पारितोषिक प्राप्त झाले. तिवसा येथील यादव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक प्रशांत हरमकर यांच्या ‘अर्थचिंतन’ ग्रंथास ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथ पारितोषिक‘ प्राप्त झाले आहे.
अमरावतीच्या किरणनगर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक राजश्री रायभोग यांच्या ‘महात्मा गांधींच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू- व्यक्तिविकास’ या शोधनिबंधास ‘पद्मजा गंधे पारितोषिके’ प्राप्त झाले आहे. कौटिल्य ज्ञानप्रबोधिनीच्या दशकपूर्ती वर्षांत तीन पारितोषिके प्राप्त झाल्याबद्दल प्रबोनिधीचे संचालक दि.व्यं. जहागिरदार, मुक्ता जहागिरदार, उपाध्यक्ष मंगला कुळकर्णी, के.एम. कुळकर्णी आदींनी पारितोषिक विजेत्यांचे कौतुक केले आहे. चोरे, हरमकर व रायभोग या तिघांनीही पुरस्काराची रक्कम‘कौटिल्य’ ज्ञान प्रबोधिनीला बहाल केली.